एका फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपवर काकांकडून चुकून ‘तसला’ फोटो पाठवला गेला. या ग्रुपमध्ये तरुण मंडळींपासून घरातले काका, काकी, मामा, मावश्या, आत्या, आई, बाबा असे सगळेच होते. लाजिरवाणा प्रसंग ओढवल्याने बिचा-या काकांना पुढे नेमकं काय करावे हे कळले नाही. ग्रुप अॅडमीनने तातडीने पावले उचलत ग्रुपमधून इतर सर्वांना काढून टाकले. पण हे सगळे करण्यात एवढा उशीर झाला होता की एव्हाना सगळ्यांनीच ‘तो’ फोटो पाहिला होता. सर्वात वाईट म्हणजे लागलीच हा किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल झाला. आता असा वाईट अनुभव आलेले ते काका काही पहिलेच नसतील.

शाळा, कॉलेज किंवा मित्रांच्या ग्रुपवर ‘तसले’ मेसज किंवा फोटो शेअर होत असतातच. पण हा सगळा प्रकार फॅमिली ग्रुपमध्ये चालत नाही. पण कधी कधी सज्जन ग्रुपमध्ये ‘तसले’ फोटो चुकून पडतात. बरेचजण अशा प्रकारच्या अनुभवातून गेले असतीलही पण अशी वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी तुम्ही काही खबरदारी घेतली तर मात्र तुम्ही यातून नक्कीच वाचू शकता. असा प्रसंग आलाच तर काय करायचे या संबधीचा एक उपाय असलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ही पोस्ट कदाचित तुम्हाला वाचवू शकेल.
– जर तुम्ही ग्रुपमध्ये चुकून काही फोटो पाठवला आणि तो फोटो लोड होत असताना तुमच्या लक्षात आले तर पटकन फोन ‘फ्लाईट मोड’वर टाका.
– फोन फ्लाईट मोडवर टाकल्याने तुमचा फोटो लोड होणे थांबते, त्यावेळी पटकन आपल्या मोबाईलमधून तो फोटो डिलिट करा असे केल्याने तो फोटो त्या ग्रुपमध्ये जात नाही.
– दुसरा पर्याय म्हणजे जर तुमच्या इंटरनेटचा स्पीड स्लो असेल आणि हा फोटो लोड व्हायला बराच वेळ लागत असेल तर पटकन तो ग्रुप ब्लॉक करा जेणेकरून तो फोटो तिथे लोड होणार नाही.
– तिसरा पर्याय म्हणजे खबरदारी. कोणतेही फोटो पटकन एखाद्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करु नका. जर तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर फॉरवर्डचा ऑप्शन वापरण्याऐवजी त्या ग्रुपमध्ये जा. तिथे अटॅच फोटोचा पर्याय असेल तो वापरून मगच तो फोटो पाठवा. जेणेकरुन अशी वेळ आपल्यावर येणार नाही.