भारतीय संस्कृतीमधील अनेक गोष्टींचं महत्व पाश्चिमात्यांना ठाऊक आहे असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे अनेकदा भारतातील गोष्टीच पाश्चिमात्य देशांमध्ये वेगळ्याच नावाने पण चढ्या दरात विकल्या जातात. अनेकदा इंटरनेटवर असे प्रकार चर्चेत असतात. अशीच एक चर्चा सध्या नेटवर सुरु आहे ती न्यूझीलंडमध्ये विकल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या खाटेची.
न्यूझीलंडमधील एका फर्निचर ब्रॅण्डने व्हिंजेट प्रोडक्टच्या नावाखाली भारतामध्ये चारपाई नावाने ओळखली जाणारी खाट विक्रीसाठी काढली आहे. अॅनाबेल्स या फर्निचरच्या दुकानाने ‘व्हिंटेज इंडियन डेबेड’ या नावाने ही खाट विकायला काढली आहे. भारतामध्ये चार पायांवर वेल्डींगने जोडलेल्या चौकोनी लोखंडी ढाच्यावर जाड पट्ट्या बांधून तयार केल्या जाणाऱ्या चारपाईवर या ब्रॅण्डने केवळ एक पांढरी चादर टाकून त्याला ‘आलिशान’ लूक देण्याचा प्रयत्न केलाय. पण सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे या खाटेची किंमत. भारतामध्ये ही खाट जितक्या किंमतीला मिळते त्याच्या १०० पट अधिक किंमत या खाटेसाठी आकारण्यात येत आहे.
अॅनाबेल्स या कंपनीने ही खाट एकदम वेगली आणि ओरिजनल क्रिएशन असल्याचं सांगत ती ८०० न्यूझीलंड डॉलर्सला म्हणजेच ४१ हजार २११ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिलीय. भारतामध्ये कोणत्याही लोकल बाजारापेठेमध्ये दरामध्ये नीट घासाघीस केल्यास अगदी ४०० रुपयांपासून ही खाट उपलब्ध होते. त्यातही थक्क करणारी गोष्ट म्हणजे या बेडची किंमत ही १२०० न्यूझीलंड डॉलर्स म्हणजे ६१ हजार रुपये असल्याचं सांगून विशेष सूट म्हणून तो ४१ हजारांना उपलब्ध असल्याचं या वेबसाईटवर दाखवण्यात आलंय.
Charpai, Charpaya, or Manji is a traditional woven bed commonly used in the Indian subcontinent. It is also known as Khaat or Khatia. Charpai is well known due to its natural qualities mostly it is used in warm areas; its net is made out of cotton and natural fibres. pic.twitter.com/nVWHWyd3qM
— Zeeshan Yaseen Junejo (@ZeeYaseenJunejo) August 25, 2021
खरं तर न्यूझीलंडमध्ये ४१ हजारांना चारपाई विकणाऱ्या या कंपनीने भारतामधूनच तिथे नेल्याचं इंडियाटाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
केवळ खाटच नाही तर अनेक गोष्टी या कंपनीने भारतीय बनावटीच्या व्हिंजेट या नावाखाली विक्रीसाठी काढल्या असून वाटेल त्या किंमतीला तिथे विक्रीसाठी ठेवल्यात. विशेष म्हणजे यासाठी गिऱ्हाईकही त्यांना मिळत आहे.
अशाप्रकारे भारतीय टच असणाऱ्या वस्तू परदेशामध्ये वाटेल त्या किंमतीला विकल्या जाण्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा इंटरनेटवर असे प्रकार समोर आले असून भारतीय लोक या गोष्टींवरुन परदेशातील लोक कशात पैसा खर्च करतील सांगता येत नाही अशाच प्रतिक्रिया देताना दिसतात.