पाकिस्तानी कलाकारांना मायदेशी परत जाण्याची धमकी देणे हे चुकीचे आहे असे मानणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ अनेक बॉलीवूड दिग्गज पुढे आले आहेत. यात नुकताच पाकिस्तानी कलाकारांना समर्थन देत अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक करण जोहर आणि महेश भट्ट यांनी वाद ओढावून घेतला आहे. पण ज्यांनी ज्यांनी या कलाकारांना समर्थन दर्शवले आहे त्यांना एका भारतीय सैनिकाने फेसबुकवर लांबलचक पत्र लिहीले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या जवानाचे पत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
‘उरी मधील हल्ल्यात १९ जवान शहिद झाले. पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ बोलणा-या या कलाकारांना हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल एक शब्दही का बोलावासा वाटत नाही’ असा सवाल त्याने केला आहे. ‘सगळ्यांना फवाद खान हा पाकिस्तानात परत गेला याचे दु:ख आहे. पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवून काय उपयोग आहे का ? असा सवाल सगळ्यांनी केला  मग हाच भेदभाव सैनिकांसोबत का केला जातो? सीमेवर सैनिक देशातील जनता सुरक्षित रहावी यासाठी आपले प्राण देतात. एखाद्या सैनिकाने वरिष्ठाला सांगितले की आम्ही येथे देशासाठी प्राणाची आहुती देतो मात्र दुसरीकडे देशातील नागरिक मात्र काहीच घडले नाही असा आव आणून वागत आहेत. तर तुम्हाला आमचे वागणे रुचेल का ? असा उव्दिग्न सवालच या जवानाने उपस्थित केला आहे. देशभक्तीची जबाबदारी फक्त सैनिकांची नसून देशातील प्रत्येकाची आहे. करण जोहर आणि महेश भट्ट म्हणतात हे वैयक्तिक युद्ध नाही. मग त्यांच्या सारखी भूमिका सैनिकांने घेतली तर ? सीमेपासून दूर सुरक्षित ठिकाणी बसून शांततेवर गप्पा मारणे सोपे आहे. पाकिस्तानी कलाकारांना समर्थन देणा-या या लोकांना खरे तर कोणत्या पार्टीला जावे आणि आपला चित्रपट किती पैसे कमावणार यातच रस असतो. यांच्यापेक्षा १० वर्षांच्या मुलीला देशाचे हित चांगले समजते असा टोला या सैनिकाने आपल्या पत्रातून लगावला आहे.