‘झुंड में सुअर आते है शेर अकेला आता है,’ अशी म्हण हिंदीमध्ये प्रचलित आहे. अनेक प्राणी अभ्यासकही वाघ एकट्यानेच शिकार करतो असं सांगतात. मात्र मध्यप्रदेशमधील पेंच राष्ट्रीय उद्यानामधील एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. या अभयारण्यामध्ये भटकंतीसाठी गेलेल्या पर्यटकांना चक्क दोन वाघ एका हरणाचा पाठलाग करताना दिसले. हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय उद्यानामधील तुरिया गेट परिसरामध्ये काही पर्यटक गाडीमधून जंगल सफारीचा आनंद घेत होते. त्याचवेळी त्यांना तिथे एका काळवीट दिसले. या काळवीटाचा फोटो काढण्यामध्ये पर्यटक व्यस्त असतानाच अचानक एक वाघ त्या काळवीटाचा पाठलाग करु लागला. काळवीट जोरात धावू लागला, तितक्यात समोरील गवतामागून दुसरा वाघ आला आणि तो ही त्या काळवीटाचा पाठलाग करु लागला. हा सर्व थरार पाहून पर्यटक थक्क झाले. कॅमेरामध्ये कैद झालेला हा सर्व घटनाक्रम आयएफएस अधिकारी असणाऱ्या सुशांत नंदा यांनी ट्विटवरुन शेअर केला आहे.

वाघीणीची ओळख पटली

पेंच राष्ट्रीय अभयारण्यामधील प्राणी अभ्यास करणाऱ्या आखिलेश मिश्रा यांनी रविवारी शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमधील वाघीण ही ‘लंगडी’ नावाची वाघीण असल्याचं स्पष्ट केलं आहे. विश्व प्रसिद्ध ‘कॉलरवाली वाघीण’ ही ‘लंगडी’ची आई आहे. ‘कॉलरवाली वाघीणी’ने पेंच व्यघ्र प्रकल्पामध्ये २८ वाघांना जन्म दिला आहे. हा एक विश्वविक्रम आहे. आता याच २८ पैकी एक असणाऱ्या ‘लंगडी’नेही बछड्यांना जन्म दिला आहे. या बछड्यांचे वय १० महिने आहे.