एका छोट्याश्या विषाणूने संपूर्ण जगभर कहर माजवला होता. गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. करोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणं, सार्वजानिक ठिकाणी तापमान तपासणी यासारखे उपाय वापरले गेले. परंतू आता या सगळ्या गोष्टींची भूमिका महत्त्वाची असली तरी लोकांना हळूहळू यांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. पण एका चिमुकलीने सर्वांना करोना नियमांची आठवण करून दिलीय. एका सुरक्षारक्षकाला तिची तापमान तपासणी करण्यासाठी विनवणी करणाऱ्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे लहान मुलांना समजलेलं वास्तव मोठ्या माणसांच्या पचनी कधी पडणार, असा प्रश्न आपसूक निर्माण होत आहे.

हातात खेळणं घेऊन सुरक्षारक्षकाला करोना नियमांची आठवण करून देणाऱ्या या छोट्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूपच भावलाय आणि अनेकांनी तो लागोलाग शेअर सुद्धा केला आहे. या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसून येतोय. जनतेच्या सुरक्षेसाठी विविध सार्वजनिक ठिकाणी तापमान मापक यंत्र बसवण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा गर्दीमुळे तिथले सुरक्षारक्षक काही लोकांकडे दुर्लक्ष करतात. महामारीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी आवश्यक गोष्टी करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि याचं सोनेरी उदाहरण या चिमुरडीने दिलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन सुरक्षारक्षक एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत. हातात खेळणं घेतलेली एक छोटी मुलगी आपल्या इवल्या इवल्याश्या पावलांनी सुरक्षारक्षकाकडे जाते आणि त्याचा हात पकडत काही तरी बोलण्याचा प्रयत्न करते. यावेळी या चिमुकलीने तिच्या चेहऱ्यावर मास्क लावलेलं दिसून येत आहे. त्यानंतर जेव्हा या चिमुकलीकडे सुरक्षारक्षकाचं लक्ष जातं तेव्हा ती आपला एक हात पुढे करत तिची तापमान तपासणी करण्याची विनवणी करते. हे पाहून सुरक्षारक्षक सुद्धा तिची तापमान तपासणी करतो. त्यानंतर खेळणं दुसऱ्या हातात घेऊन तो हात सुद्धा पुढे करून स्वतःची तापमान तपासणी करून घेते. ती इथवरंच थांबत नाही तर तिच्या हातातल्या बाहूल्याची सुद्धा तापमान तपासणी करून घेते.

आणखी वाचा : PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रोब्लेमवर आहे सोल्यूशन

आणखी वाचा : ‘तुम्ही यूएन मिस केलं!’, फूड डिलिव्हरीसाठी PM आणि CM ना टॅग केलेल्या अभिनेत्याच्या ‘त्या’ ट्विटवर नेटिझन्सच्या कमेंट्सचा महापूर

चिमुकलीला समजलं, मोठ्यांना कधी समजणार?

‘एक जबाबदार नागरिक’ अशी कॅप्शन देत दिनेश जोशी नावाच्या एका यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ पाहून या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकलीचं कौतुक करताना दिसून येत आहेत. जर एवढ्याशा चिमुकलीला कळलं, तर आपल्याला का वळत नाही, असा प्रश्न समोर उभा राहतो आहे. जर करोनापासून वाचायचे असेल, तर या गोड चिमुकलीचा पाहा असं तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओ शेअर सोशल मीडियावरील नेटिझन्स सुद्धा करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्तंत ३१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओखाली असलेला कमेंट बॉक्स नेटिझन्सच्या वेगवेगळ्या कमेंट्समी भरला आहे. काही युजर्सनी मुलीच्या संगोपनाचं कौतुक केलंय आणि तिला एक जबाबदार नागरिक म्हटलंय.