Tomato fact: आजच्या काळात टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वांत अनिवार्य घटक बनला आहे. त्याशिवाय आपली भाजी, आमटी, सांबार, सूप, सॅलड किंवा अगदी सॉसदेखील अपूर्ण वाटतात. सकाळच्या पोळीभाजीपासून ते संध्याकाळी पास्ता व पिझ्झापर्यंत प्रत्येक पदार्थात टोमॅटोचा बेस असतो. त्याचा लाल रंग, गोड व आंबट चव आणि मऊ पोत यांमुळे प्रत्येक पदार्थाला एका वेगळीत चव येते. मात्र, तुम्हाला माहितीये का? एकेकाळी टोमॅटोला मांसाहारीच मानलं जात होतं. ‘लोकसत्ता’नं आयोजित केलेल्या लीटफेस्ट या कार्यक्रमात खाद्यसंस्कृतीवर बोलताना डॉ. कारखानी यांनी टोमॅटोचा रंजक इतिहास सांगितला आहे

एकेकाळी मांसाहार म्हणून ओळखला जाणारा टोमॅटो आज आपल्या स्वयंपाकघराचा शाकाहारी भाग बनला आहे. कधी सांबारला सुगंध, तर कधी फक्त कच्चा खाल्ला तरी जिभेवर गोड-आंबटपणा ठेवून जातो. इतकंच नाही, तर घरात टोमॅटो संपले आणि टोमॅटोशिवाय केलेली भाजी त्यात कशाची तरी उणीव आहे याची जाणीव वारंवार करून देत राहते. एवढं या फळानं आपल्या आहारातील स्थान घट्ट केलं आहे.

आपल्या खाद्यसंस्कृतीत प्रत्येक पदार्थाची एक वेगळी कथा असते. तसाच आपला टोमॅटोही उशिरा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनला. डॉ. मोहसिना मुकादम यांनी आपल्या खाद्यसंस्कृतीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. तसेच टोमॅटो आपल्या आहारात उशिरा का आला हेही सांगितले. याचं कारण म्हणजे त्याचा रंग, आकार व लिबलिबीतपणा लोकांना जरा विचित्र वाटत असे. गोव्याच्या काही भागांत त्याला मांसाहारी फळ म्हणून ओळखलं जायचं. लोकांनी तो साध्या भाज्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे हाताळला. भाजी विक्रेतेही टोमॅटो हा इतर भाज्यांमध्ये मिसळू नये म्हणून तो वेगळ्या टोपलीत ठेवतात.

समाजसुधारकांच्या घरात टोमॅटोचं सेवन अधिक काळजीपूर्वक केलं जायचं. टोमॅटो कापण्यासाठी स्वतंत्र चाकू, विळी आणि भांडे होते. कारण- तो मांसाहार समजून, त्याचा सामान्य भाज्यांशी संपर्क टाळला जात होता. परंतु, त्याचदरम्यान तापाची साथ सुरू झाली आणि औषधीय दृष्ट्या टोमॅटोचा उपयोग वाढला.तापावर कडू औषध सहजतेने पिणे शक्य व्हावे म्हणून सोबत मोसंबीचा रस प्यावा, असे डॉक्टरांकडून त्यावेळी सांगितले जात असे. पण, सामान्य लोकांसाठी मोसंबी महागडी ठरत. मग त्याला पर्याय म्हणून त्यांनी टोमॅटोचा रस पिणे सुरू केले.

या औषधीय उपयोगामुळेच टोमॅटोचा लोकांच्या आहारात प्रवेश झाला आणि मांसाहारी फळ म्हणून ओळखले जाणारे हे फळ सर्वसामान्यांच्या घरांमध्ये पोहोचले. आज टोमॅटो केवळ भाजीचा किंवा सलाडचा घटक नाही, तर आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक अनिवार्य भाग आहे. दरम्यान, डॉ. सागर कारखानी यांनी म्हटल्याप्रमाणे, आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दलची ही माहिती दस्तऐवजीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे; अन्यथा ही माहिती केवळ कथांपुरती मर्यादित राहील.