Bank Toxic Culture: नोकरी करणाऱ्या लोकांना आठवड्याच्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या सट्ट्या मिळतात. कधी कधी तब्येत बरी नसेल, घरात काही प्रसंग असल्यास नोकरी करणाऱ्यांना सुट्टी मागावी लागते. असाच एक सुट्टीसंदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका प्रसिद्ध बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मॅनेजरने ऑनलाइन मिटिंग सुरू असताना सुट्टीवरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमध्ये कॅनरा बँकेचे अधिकारी लोकपती स्वेन त्यांच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणताना दिसत आहेत. या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवरून त्यांना धारेवर धरले. “जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह प्रवास करण्यासाठी रिकव्हरीमध्ये सहभागी झाला नाही, तर तुमच्या कुटुंबासह नरकात जा. बँकेने तुम्हाला नोकरी दिली आहे ती काम करण्यासाठी, तुमच्या कुटुंबासह प्रवास करण्यासाठी नाही. मला तुमच्या कुटुंबाची पर्वा नाही.” हे शब्द ऐकून कोणालाही प्रचंड राग येईल.
बँकेचा प्रतिसाद आणि लोकांची प्रतिक्रिया
या व्हिडीओनंतर कॅनरा बँकेने एक निवेदन जारी केले आहे. “बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे योगदान महत्त्वाचे मानते. हे वैयक्तिक मत आहे. बँक अशा वर्तनाचे अजिबात समर्थन करच नाही”, असे त्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी प्रश्न विचारला आहे की, अशा प्रकरणांमध्ये कारवाई केवळ विधानांपुरतीच का मर्यादित आहे?
तसंच दुसऱ्या एका युजरने विचारले की, कामाच्या नावाखाली तुम्ही माणुसकी विसरला आहात.
