Boss Started Crying Because Samosas Not Offered: एका महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर कामाच्या ठिकाणचा भयानक अनुभव शेअर केला आहे. या महिलेने एका कंपनीत सात वर्षे काम केले आहे. कंपनीमध्ये आधी दोन व्यवस्थापक होते. नंतर आणखी एका महिला व्यवस्थापिकेची भरती करण्यात आली. ही नवी व्यवस्थापिकाही दोन इतर व्यवस्थापकांमध्ये सामील झाल्यामुळे कंपनी विषारी नरक झाल्याचे या महिला कर्मचाऱ्याने म्हटले आहे. तिने लिहिलेल्या रेडिट पोस्टमध्ये या तिन्ही व्यवस्थापकांचा विषारी त्रिकूट म्हणून उल्लेख केला आहे.
कर्मचाऱ्यांना नाहक त्रास
या महिला कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हे तिन्ही व्यवस्थापक दररोज गोंधळ निर्माण करत होते. नवीन महिला व्यवस्थापिका कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी तिला अभिवादन करावे, असे म्हणायची. आणि जर कर्मचाऱ्यांनी तसे केले नाही, तर बैठका घेऊन त्यांचा अनादर करायची. मूर्ख आणि क्षुल्लक कारणांसाठी सहकाऱ्यांना त्रास दिला जात असे.”
…आणि ते रडू लागले
पोस्टमध्ये या महिलेने एक मजेशीर किस्साही सांगितला आहे. त्यामध्ये तिने म्हटले की, “एकदा मी व्यवस्थापकांना समोसे न दिल्यामुळे मला त्रास देण्यात आला. त्यांनी म्हटले की, मी जाणूनबुजून त्यांच्यापासून दूर राहत आहे. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि ते रडू लागले”, असे ही महिला कर्मचारी पोस्टमध्ये म्हणाली.
कंपनीत कर्मचाऱ्यांना सातत्याने शिस्तभंगाच्या नोटीशीच्या धमक्या दिल्या जात होत्या, त्यामुळे अनेकांना नोकरी सोडावी लागली. इतरांनी काम सोडल्यानंतर, ही महिला कर्मचारी स्वतः सतत अवास्तव कामाचा ताण सहन करत होती.
अखेर राजीनामा
नवीन व्यवस्थापिकेचा अनुभव सांगताना ही कर्मचारी पोस्टमध्ये म्हणाली की, “एके दिवशी ही व्यवस्थापिका तणावात होती. तेव्हा मी तिला काही मदत करू का, असे विचारले आणि ही माझी सर्वात मोठी चूक ठरली. यामुळे ती माझ्यावर रागावली आणि संपूर्ण ऑफिससमोर माझा अपमान केला.”
यानंतर नवीन व्यवस्थापिकेने तिला शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी बोलावले. तेव्हा या महिला कर्मचाऱ्याने जागेवरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “राजीनाम्यानंतर ३० मिनिटांच्या आत, मला इमारतीतून बाहेर काढण्यात आले. त्यांनी माझा ३० दिवसांचा नोटीस कालावधी माफ केला, परंतु मला परत कंपनीत येण्यास बंदी घातली. मी मला माझ्या उबरमध्ये बसेपर्यंत ते माझ्याकडे पाहत होते.”
