आई-वडिलांनंतर आपल्या जीवनात शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या व्यक्तीचे पालनपोषण आणि संगोपन करण्यात पालकांप्रमाणेच शिक्षकांचीही भूमिका असते. आपण कितीही मोठे झालो, मोठ्या पदावर गेलो तरीही लहानपणीचे आपले एक आवडते शिक्षक असतात, ज्यांची आपणाला आठवण येत असते. सध्या अशाच विद्यार्थ्यांच्या लाडक्या असणाऱ्या शिक्षिकेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शिक्षिकेने बालवाडीतील तिच्या शेवटच्या दिवसासाठी एक सुंदर प्लॅन केला होता. जो विद्यार्थ्यांना खूप आवडला आहे. शिवाय त्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे. तर या शिक्षिकेने केलेला प्लॅन नेमका काय होता आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर का व्हायरल होतोय ते जाणून घेऊया.
युनायटेड स्टेट्समधील एका प्राथमिक शाळेतील हीदर नावाच्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना तिचा ड्रेस त्यांच्या आवडीप्रमाणे रंगवायला सांगितलं होता. शिवाय विद्यार्थ्यांनी रंगवलेला ड्रेस ती शाळेतील तिच्या शेवटच्या दिवशी घालून येणारं असंही तिने विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. सांगितल्याप्रमाणे तिने विद्यार्थ्यांनी रंगवलेला ड्रेस घालून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. ज्याचा व्हिडिओ स्वतः हीदरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये हीदर विद्यार्थ्यांनी रंगवलेला पांढरा ड्रेस घालून आल्याचं दिसत आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिने मुलांना ड्रेसवर जे हवे ते रेखाटण्याची परवानगी दिली होती. शिवाय त्यांना वचन दिले की ती शाळेत तिच्या शेवटच्या दिवशी तो ड्रेस घालून येईल. “काही आठवड्यांपूर्वी मी विद्यार्थ्यांना माझ्या पांढऱ्या ड्रेसवर काहीही रेखाटण्याची परवानगी दिली होती. आज माझा शेवटचा दिवस असून मुलांनी रंगवलेला ड्रेस घालून मी शाळेत जाणार आहे, मला त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहायच्या आहेत.” असं ती व्हिडीओच्या सुरुवातीली म्हणत आहे.
व्हिडिओमध्ये हीदर वर्गात एक लांब कोट घालून वर्गात प्रवेश करताना दिसत आहे. यावेळी वर्गातील विद्यार्थी तिला “तुम्ही आम्ही रंगवलेला ड्रेस घालणार होता”, अशी आठवण करुन देतात. कारण आपल्या शिक्षिकेला कोट घालून आल्याचं पाहताच मुलांना आपली शिक्षिका आपण रंगवलेला ड्रेस घालायला विसरल्या आहेत, असं वाटतं. मात्र, जेव्हा शिक्षिका कोट बाजूला सारते आणि विद्यार्थ्यांना कोटच्या आतमध्ये असणारा आणि त्यांनी रंगवलेला ड्रेस दिसतो, तेव्हा ते आनंदाने ओरडायला सुरुवात करतात.
या बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षिकेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “खूप मनमोहक क्षण आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं “मुले या शिक्षिकेला आणि तिच्या दयाळूपणाला कधीच विसरणार नाहीत! हा क्षण त्यांच्या आयुष्यभर आठवणीत राहिल.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “मला १८ आणि ११ वर्षे वयोगटातील दोन मुले आहेत. त्यांना तुमच्यासारखा एकच शिक्षक आहे. तुम्ही लाखात एक आहात. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही नेहमी आनंदी राहा.”