भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. भारतीय परंपरेनुसार विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, हे पाहून अनेक परदेशातील लोकांंनासुद्धा भारतातील लोकांचे राहणीमान, संस्कृती, कला व येथील प्रसिद्ध पदार्थ शिकण्याची खूप उत्सुकता असते. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. जपानमध्ये दक्षिण भारतीय (South Indian) पद्धतीचं एक हॉटेल आहे आणि हे भारतीय नाही तर जपानी लोक चालवतात. तसेच या हॉटेलमधील पदार्थ बनवण्यासाठी जपानी तरुण दर सहा महिन्यांनी चेन्नईला भेट देतात.
गोव्याचे मुख्यमंत्री यांचे माजी सल्लागार प्रसन्न कार्तिक यांनी जपानचे प्रमुख शहर क्योटोला भेट दिली आहे. तसेच या शहरात दक्षिण भारतीय हॉटेल पाहून ते अगदीच थक्क झाले. त्यांनी या हॉटेलचा एक फोटो शेअर केला आणि पोस्टमध्ये असे लिहिलं आहे की, मी जपानमधील एका ‘तडका’ नावाच्या दक्षिण भारतीय हॉटेलला भेट दिली आहे. तडका हे हॉटेल जपानी तरुण चालवतात. तसेच ते दर सहा महिन्यांनी एकदा चेन्नईला भेट देतात व तिथे जाऊन नवनवीन पदार्थ शिकतात, त्यांचा सराव करतात आणि त्यांच्या हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये त्यांचा समावेश करतात.
हेही वाचा…जगातील पहिली हात नसलेली धनुर्धारी! तरुणीची कामगिरी पाहता आनंद महिंद्रांनी कार देण्याचे दिले आश्वासन
पोस्ट नक्की बघा :
तडका हॉटेलची वैशिष्ट्ये :
तडका हॉटेलमध्ये दाक्षिण भारतीय प्रसिद्ध इडली, डोसा-सांबार हे पदार्थ उपलब्ध आहेत आणि हे आतापर्यंतचे सगळ्यात छान असे दक्षिण भारतीय जेवण होते, असे प्रसन्न कार्तिक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तडका या हॉटेलचे जास्तीत जास्त ग्राहक भारतीय नाही तर जपानी आहेत; जे येथील खाद्यपदार्थांच्या प्रेमात पडले आहेत. जपानमध्ये चॉप-स्टिक्सने अन्न खाल्लं जातं. पण, तडका हॉटेलमध्ये दक्षिण भारतीय अन्न खाण्यासाठी एक पोस्टर लावण्यात आले आहे, जिथे हे अन्न कशा प्रकारे भारतीय पद्धतीत हाताने खायचं हे टप्प्या-टप्प्याने दाखवण्यात आलं आहे. तसेच या जपानी तरुणांनी भारतीय संस्कृतीला मनापासून आपलंसं केलं आहे. त्यांनी हिंदू धर्माचे सखोल ज्ञान विकसित केले आणि ते त्याच्या प्रेमात पडले आहेत. कारण त्यांनी हॉटेलमध्ये एक देव्हारा तयार करून देवांचे फोटो लावले आहेत आणि पूजा करण्यासाठी पूजेच्या काही वस्तूसुद्धा ठेवल्या आहेत. भारताच्या संस्कृतीत यांचे खास योगदान अगदीच कौतुकास्पद आहे, असे प्रसन्न कार्तिक यांंनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे आणि कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @prasannakarthik या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. प्रसन्न कार्तिक यांनी आपल्या पोस्टमध्ये तडका या हॉटेलची वैशिष्ट्ये खास फोटो कॅप्शनच्या मदतीने सगळ्यांसमोर शेअर केली आहेत.