आठवडा उलटून गेला तरी बँकेच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी असलेली रांग काही केल्या कमी होत नाही. आठवडाभर नागरिकांना नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होईल असे सांगत पंतप्रधानांनी गैरसोयीबद्दल माफी मागितली होती. पण एक आठवडा उलटला तरी बँकेच्या बाहेरचे चित्र काही बदलले नाही. नोटा बदलण्यासाठी आणि पैसे बँकेत जमा करण्यासाठी बँका सुरू होण्याआधीच नागरिक तासन् तास बँकेबाहेर उभे आहेत. त्यामुळे नोटा हव्या असतील तर रांगेपासून सुटका नाही. पण तासन् तास बँकेत उभे राहण्यापासून काही जणांनी अजब गजब शक्कल लावून आपली सुटका करून घेतली आहे. याचे काही फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
मध्यप्रदेशमधल्या शिवपूरी गावातील लोकांनी बँकेबाहेर रांगेत उभे राहण्याऐवजी आपले पासबुकच रांगेत लावले आहे. उन्हात दोन तीन तास रांगेत उभे राहण्यापेक्षा या गावक-यांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. तर छत्तीसगढच्या ग्रामीण बँकेतील सांकारा शाखेबाहेरही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. बँक सुरू व्हायच्या आधीच नागरिकांनी बँकेबाहेर आपल्या चप्पला एका रांगेत लावून ठेवल्या होत्या. नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर उन्हात अन्न पाण्यावाचून उभे राहावे लागत आहे. आतापर्यंत या निर्णयामुळे किंवा तासन् तास रांगेत उभे राहिल्यामुळे देशभरात जवळपास ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी लोकांना त्रास होऊ नये यासाठी सेवाभावी संस्थाकडून अन्न पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. पण अनेक ठिकाणी अशी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने लोकांनी शक्कल लढवत अशा नवा उपाय शोधून काढला आहे.
Madhya Pradesh: Unique 'passbook queue' seen in Shivpuri #DeMonetisation pic.twitter.com/ct1Pn5IB30
— ANI (@ANI) November 17, 2016