मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील कुत्र्यांशी संबंधित वादाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कुत्र्यांमुळे अनेक लोकांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना देखील व्हायरल होत आहेत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका कुत्र्याला लिफ्टमध्ये नेण्यावरुन वाद झाला आहे. ज्यामध्ये एका माजी प्रशासकीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडातील सेक्टर १०८ येथील पार्क लॉरेट हाउसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये कुत्रा नेण्यावरून एक महिला आणि माजी आयएएस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला, ज्याचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. हाऊसिंग सोसायटीच्या लिफ्टमध्ये एक महिला कुत्र्याला घेऊन जात होती, त्यावेळी एक माजी आयएएस अधिकारी तिथे आले आणि त्यांनी कुत्रा लिफ्टमधून कुत्रा न्यायचा नाही असं सांगितलं, ज्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर महिलेने माजी आयएएस अधिकाऱ्याचा फोन फेकून दिला. महिलेच्या या कुतीमुळे रागवलेल्या माजी आयएएस अधिकाऱ्याला संयम सुटला आणि त्यांनी थेट महिलेच्या कानशिलात लगावली. ही सर्व घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
महिलेने फोन फेकताच संतापले माजी आयएएस –
सांगितलं जात आहे की, माजी आयएएस आरपी गुप्ता यांनी महिलेला तिच्या कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यास विरोध केला होता. मात्र, महिलेने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि कुत्र्याला लिफ्टमधून बाहेर काढलं नाही. त्यामुळे आयएएस अधिकाऱ्याने महिलेचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल बाहेर काढला तेव्हा महिलेने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि फेकून दिला. त्यामुळे आयएएस अधिकारी संतापले थेट महिलेला थप्पड मारली. ही सर्व घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महिलेच्या पतीची माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण –
व्हायरल व्हिडीओमध्ये महिला आणि माजी अधिकाऱ्याचा वाद सुरु असताना तिथे महिलेचा पती आल्याचंही दिसत आहे. यावेळी महिलेचा पतीने माजी आयएएस अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात करतो. पण काही लोकांनी मध्यस्ती करुन हे भांडण थाबल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान या भांडणाची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची माहिती दखल घेत व्हिडिओच्या आधारे पुढील तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, अद्याप कोणत्याही पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.