पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचत नाहीत, असं नेहमी बोललं जातं. अनेक चित्रपट किंवा मालिकांमध्ये गुन्हा घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचतात, असं दाखवलं जातं. परंतु सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोलिसांच्या कामाचे कौतुक कराल यात शंका नाही. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये घराचा दरवाजा तोडून एका व्यक्तीला बाहेर काढल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सहारनपूरचा आहे. येथील दोन पोलिसांनी असं काही काम केल आहे की, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिवाय अनेकांनी त्या दोघांच्या धाडसाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये, दोन पोलीस मिळून एका घरातील दरवाजावर लाथा मारत असल्याचं दिसत आहे. ते दोघे हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी दोघेही टीव्हीवरील प्रसिद्ध पात्र दया यांच्या स्टाईलने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला दरवाजा तुटणार नाही असं वाटतं परंतु पोलीस खूप जोरजोरात त्यावर लाथा मारतात त्यामुळे शेवटी दरवाजा तुटल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

दरवाजा तोडताच पोलीस धावत घरामध्ये जातात, यावेळी घरामध्ये एक व्यक्तीला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो एका खुर्चीवर उभं राहून गळ्यात कापड बांधून पंख्याला गळफास लावून घेण्याच्या तयारीत असतानाच सुदैवाने पोलीस त्याला उचलून बाहेर घेऊन येतात. दरम्यान दोन्ही पोलीस त्या व्यक्तीला बाहेर आणून खुर्चीवर बसवतानाही दिसत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, एक महिला ज्या खुर्चीवरून तो व्यक्ती गळफास लावून आत्महत्या करणार होता, ती खुर्ची बाहेर काढते. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर पोलीस पहिल्यांदा वेळेवर पोहोचल्याची मिश्कील टिप्पनी केली आहे. मात्र, अनेकांनी पोलिसांच्या धाडसाचं आणि त्यांच्या तत्परतेचं तोंडभरुन कौतुक केल्याचंही पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मृत्यू टळला. त्याबद्दल पोलिसांचे आभार. तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “पोलीस वेळेत पोहोचले आणि त्यांनी आपले कर्तव्य बजावले.”