School Principal Heart Winning Video : आपल्यापैकी बरेचजण शाळेत असताना मुख्याध्यापकांना घाबरायचे. शाळेच्या कॉरिडॉरमध्ये फिरताना मुख्याध्यापकांना येताना पाहून शांतपणे वर्गात जाऊन बसायचे, ते वर्गात येताच अभ्यास करत असल्याचे नाटक करायचो. आपल्याला ओरडा पडू नये म्हणून मान खाली घालून बसायचो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मुख्याध्यापकांविषयी एक आदरयुक्त भीती होती. पण सोशल मीडियावर एका शाळेतील व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात शाळेतील मुख्याध्यापकाचे विद्यार्थ्यांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
अमेरिकेतील पेसिल्वेनियातील एका शाळेतील मुख्याध्यापकाचा हा व्हिडीओ आहे, ज्यात मुख्याध्यापकाचे विद्यार्थ्यांशी असलेले मैत्रीपूर्ण नाते पाहून सर्वांना आनंद झाला आहे. मुख्याध्यापक सकाळी शाळेत आल्यानंतर आनंदाने विद्यार्थ्यांना हाय-फाइव्ह करत खास शैलीत मैत्रीपूर्ण पद्धतीने स्वागत करताना दिसत आहेत.
मुख्याध्यापकाचा उत्साही अंदाज पाहून कॉरिडॉरमध्ये असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षणकांचा चेहरा आनंदाने खुलतो. यावेळी विद्यार्थी मुख्याध्यापकाला पाहून घाबरुन पळून न जाता त्यांच्याशी हात मिळवतात कधी अनोख्या अंदाजात स्वागत करतात. यात मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना टाळी देताना तर कधी खोड्या काढतानाही दिसत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकाला पाहून विद्यार्थी पळून न जाता तिथेच त्यांच्या येण्याची वाट पाहतात. मुख्याध्यापकाच्या या वागण्याने आता सोशल मीडियावर युजर्सचीही मनं जिंकली आहेत.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @zbauermaster नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कॉरिडॉर हे फक्त चालण्यासाठी नसून नातेसंबंध निर्माण करण्यासाठी असतात. तुम्ही लोकांचे ज्या पद्धतीने स्वागत करता तेही त्याच पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देतात. शाळा अशी जागा असावी जिथे मुले येण्यास उत्सुक असावेत. आणि हो, मजा करायला विसरू नका!”
सोशल मीडियावर लोकांनी या मुख्याध्यापकाचे खूप कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, ‘खूप छान मुख्याध्यापक. फक्त असेच लोक नेहमी लक्षात राहतात. दुसऱ्याने म्हटले की, ‘त्याचे सर्व विद्यार्थी पास आउट झाले तरी त्यांना हे आठवतील. यार, हा किती छान माणूस आहे!’ तिसऱ्याने लिहिले की, ‘या व्हिडिओचा सर्वात चांगला क्षण शेवटी आहे. जेव्हा मुले देखील प्रिन्सिपलकडून शिकतात आणि एकमेकांना त्याच प्रकारे स्वागत करतात.’