Uttarkashi Dharali Cloudburst: हिमालयाच्या कुशीत वसलेलं उत्तराखंड राज्य निसर्गसौंदर्याचं जणू वरदानच आहे. डोंगराळ रस्ते, घनदाट जंगलं, थंड हवामान, पाढंऱ्याशुभ्र वाहणाऱ्या नद्या, धबधबे आणि पर्वतरांगांमधील शांतता, पर्यटकांनी इथे खेचून आणते. पण गेल्या काही वर्षांमध्ये या राज्याला निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. अचानक भूस्खलन होणं, ढगफुटी, नद्यांचे प्रवाह बदलणं. घरांच्या भीतींवर पडणाऱ्या भेगा, कधी डोंगरातून कोसळणारे दगड, यामुळे उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये जगणं असुरक्षित झालं आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळाला. राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी (५ ऑगस्ट) ढगफुटी झाली आणि त्यामुळे अचानक पूर आला. त्यामध्ये किमान चार लोकांचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण बेपत्ता असल्याची भीती आहे. अशातच याचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ढगफुटीनंतर चिखलाखाली अडकलेल्या एका व्यक्तीनं मृत्यूला कसा चकवा दिला आहे हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल हे चमत्कारापेक्षा कमी नाही.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस चिखलाच्या ढिगाऱ्यातून ‘जिवंत’ बाहेर येताना दिसतोय. याला काही जण नशीब म्हणत आहेत, तर काही जण चमत्कार म्हणत आहेत. मात्र या व्यक्तीने घेतलेल्या एका निर्णयामुळे केवळ तो बचावला आहे. एक म्हणजे इच्छाशक्ती, डोळ्यासमोर मरण दिसत असतानाही त्यानं तिथून स्वत:ला बाहेर काढण्याचं धाडस दाखवलं. दुसरं म्हणजे, त्यानं कशाचाही विचार न करता तिथून सुरक्षित स्थळी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ढग फुटी झाल्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हर्षिल दरीजवळील धाराली गाव उद्ध्वस्त झाले. संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात ५० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे.
पाहा व्हिडीओ
उत्तरकाशीमधील धराली गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. महापुरामुळे घरे आणि इमारती वाहून गेल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा केली असून, मदतकार्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले आहे