उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक व्हिडीओ सध्या मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला नायब तहसीलदार एका तरुणीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहे. ही महिला तहसीलदार सुरक्षा रक्षकांसह एका ठिकाणी अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी आली होती. यावेळी एका तरुणीने तहसीलदारांना कोर्टाचे आदेश दाखवण्याची मागणी केली.
तहसीलदाराने तरुणीच्या वाजवली कानाखाली
ही घटना वाराणसीच्या कपसेठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीशमपूर गावात घडली, यावेळी अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी नायब तहसीलदार प्राची केसरवाणी पोहोचल्या होत्या. यावेळी एका तरुणीने त्यांना कोर्टाच्या नोटीसबद्दल विचारणा केली; ज्यामुळे त्या तरुणीशी त्यांचा वाद झाला. वादानंतर प्राची केसरवाणी यांनी रागात त्या तरुणीच्या कानाखाली मारली. या प्रकरणावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी महिला नायब तहसीलदाराला गर्दीतून बाहेर काढून वाहनाच्या दिशेने नेले.
महिला तहसीलदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप
महिला तहसीलदाराने तरुणीला केलेल्या मारहाणीमुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले; ज्यानंतर त्यांनी महिला तहसीलदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या गाडीत बसू निघून जात असताना संतप्त जमावाने त्यांवा अडवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी तहसीलदाराने म्हटले की, ज्या तरुणीला कानाखाली मारली ती तरुणी आदेशाची प्रत मागत होती. त्यामुळे त्या संतापल्या. तसेच अधिकारी म्हणाल्या की, यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली आणि प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. हा व्हिडीओ केवळ अर्धसत्यावर आधारित आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक तहसीलदारांच्या वागण्यावर ताशेरे ओढत आहेत. @gyanu999 या ट्विटर युजरने लिहिले, ‘ब्रिटिशांच्या काळात अधिकाऱ्यांसाठी भारतीयांना दुय्यम दर्जा होता; पण काही अधिकाऱ्यांसाठी ही परंपरा अजूनही कायम आहे याची लाज वाटायला हवी. दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘ज्यावेळी बारावीची विद्यार्थिनी साळवीने जमिनीशी संबंधित खटल्यात न्यायालयाच्या आदेशाची प्रत मागितली, तेव्हा महिला नायब तहसीलदाराने रागाच्या भरात तिच्या कानाखाली मारली, ही कसली अधिकारी आहे?’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या संसदीय मतदारसंघात महिला आणि तरुणींसमोर येणाऱ्या छेडछाडीच्या घटना निंदनीय आहेत. वाराणसीचे नायब तहसीलदार रजतलाब यांनी प्रश्न विचारल्याबद्दल तरुणीच्या कानाखाली मारल्याचे पाहून वाईट वाटते. त्यावर दुसऱ्याने लिहिले की, वाराणसीत प्रश्न विचारल्याबद्दल नायब तहसीलदार साहिबानेच कानाखाली मारली. जनतेने प्रश्न कोणाला विचारायचे?