भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद रविवारी ट्विटरवर जरा वेगळ्याच ‘मूड’मध्ये होता. एका पाकिस्तानी पत्रकाराने प्रसादला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण प्रसादने सणसणीत उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.

प्रसादने १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या आमिर सोहेलचा दांडा उडवला होता. एक चौकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवरही चेंडू सीमारेषेबाहेर टोलवेल असा इशारा करणाऱ्या आमिर सोहेलला प्रसादने पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत केलं होतं. त्यानंतर प्रसादने सोहेलला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला होता. तो फोटो प्रसादने रविवारी ट्विटरवर पोस्ट केला. त्यासोबत त्याने राहुल द्रविडच्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जाहिरातीतील ‘इंंदिरानगर का गुंडा हु मै’ हे कॅप्शन दिलं होतं. शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा द्रविड या जाहिरातीत वाहतूक कोंडीत अडकल्याने रागाच्या भरात ‘इंदिरानगर का गुंडा हु मै’ असं बोलताना दिसतोय.

प्रसादने आमिर सोहेलबाबत हे ट्विट करताच नजिब हसनेन नावाच्या एका पाकिस्तानी पत्रकाराने प्रसादला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘ही प्रसादच्या कारकिर्दीतील एकमेव उपलब्धी आहे’, असं उत्तर त्याने प्रसादच्या ट्विटवर दिलं. म्हणजे, प्रसादने आमिर सोहेलच्या विकेटशिवाय त्याच्या कारकिर्दीत दुसरं काही केलं नाही असं त्या पाकिस्तानी पत्रकाराचं म्हणणं होतं. त्यावर वेंकटेश प्रसादने सणसणीत उत्तर दिलं. ‘नाही नजिब भाई…काही गोष्टी नंतरसाठी राखून ठेवल्या होत्या. त्यानंतर झालेल्या पुढच्याच वर्ल्ड कपमध्ये १९९९ साली इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये पाकिस्तानविरोधात २७ धावांमध्ये पाच गडी बाद केले…२२८ धावांचं लक्ष्यही त्यांना गाठता आलं नाही…गॉड ब्लेस यू’ असं म्हणत प्रसादने त्या पत्रकाराची अक्षरशः बोलती बंद केली. त्या पत्रकाराला हे उत्तर इतकं झोंबलं की नंतचर मात्र त्याने प्रसादच्या ट्विटवर काहीही रिप्लाय दिला नाही.

१९९० च्या दशकात प्रसाद आणि जवागल श्रीनाथ यांच्या खांद्यावर भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा होती. १९९६च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध प्रसाद आणि आमिर सोहेलमध्ये झालेला वाद आजही सर्वांच्या लक्षात आहे.