Noida Dog Owner Lady Fight Video: काही दिवसांपूर्वी नोएडामधील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याची मालकीण व एका गरोदर महिलेचे भांडण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लिफ्टमध्ये चढत असताना या महिलेने कुत्र्याच्या मालकिणीला कुत्र्याला मास्क घालण्यास सांगितल्यावर तिने उलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. शिवाय महिलेचा पती मध्यस्थी करू लागताच त्यालाही कुत्र्याच्या मालकिणीने चांगलेच सुनावले. मी तुझ्या बायकोपेक्षा चांगलीच आहे असं म्हणत या जोडप्याची महिलेने चांगलीच कानउघाडणी केली होती. या घटनेनंतर कुत्र्याच्या मालकिणीला अनेकांनी ट्रोल केले होते म्हणूनच नेमका प्रकार काय घडला हे सांगण्यासाठी तिने वेगळा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओमधील कुत्र्याच्या मालकिणीचे मूळ नाव रिचा असे असून तिने या घटनेनंतर ऑनलाइन ट्रोलमुळे मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगितले. झाल्याप्रकाराबाबत बोलताना तिने आपली चूक नसून भांडणार्या जोडप्यानेच तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचेही सांगितले.

हे जोडपं जेव्हा लिफ्टमध्ये आलं तेव्हा त्यांनी रिचाच्या पाळीव कुत्र्यावर खोचक कमेंट केली, ५० रुपयांचा कुत्रा आणि २०० रुपयांचा पट्टा अशी कमेंट ऐकून रिचा भडकली शिवाय नंतर ती महिला रिचाचं बोलणं आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करू लागल्यावर तिचा पारा आणखीनच चढला. यानंतर आपली प्रतिक्रिया सुद्धा गैर होती हे मान्य करताना तिने त्या जोडप्याला व ट्रोल करणाऱ्यांना “आपण कोणत्याही जीवाची अशी किंमत कशी करू शकता” असाही प्रश्न केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रिचाचा नोएडामधील तिच्या हाउसिंग सोसायटीतील रहिवाशांशी वाद घालणारा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. 40-सेकंदाच्या क्लिपमध्ये, ती लिफ्टमध्ये तिच्या पाळीव कुत्र्याला मास्क घालण्यावरून रहिवाशांशी वाद घालताना दिसली होती.

दरम्यान, सदर घटनेचा साक्षीदार म्हणून, रिचाने ती राहत असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची एक क्लिप देखील शेअर केली आहे. रहिवाशांनी रिचाला शिवीगाळ केल्याचे गार्ड देखील मान्य करताना दिसत आहे. रिचाने यावर उत्तर देताना, “हे पाळीव प्राणी माझ्या मुलासारखे नाहीयेत का? मी अजिबात घाबरणार नाही, या गैरवर्तनाला पुरून उरेन कारण मी प्रत्येक गोष्टीवर प्रेम करते.” असे म्हटले आहे.

हे ही वाचा<< तरुणाला नग्न करून मारहाण, Video केला व्हायरल; हल्लेखोरांनी शपथ घ्यायला लावली की…

गेल्या काही महिन्यांत, सोशल मीडियावरच कित्येक वेळा लिफ्टमध्ये, इमारतीच्या आवारात पाळीव कुत्र्यांनीच डिलिव्हरी बॉय, रहिवाशी, लहान मुले यांच्यावर हल्ला केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या तोंडावर मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे.