Man Grows Grass on Head Viral Video: सोशल मीडिया हा विचित्र गोष्टींचा खजिना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात यातील काही गोष्टी या तुम्हा-आम्हालाही ‘हे कसं काय केलं?’ असं विचारायला भाग पाडतात तर काही गोष्टी फक्त “भाई हे का केलं” असा प्रश्न मनात सोडून जातात. सध्या व्हायरल होणारे एक बाबा मात्र या दोन्ही प्रश्नांचा विचार करायला भाग पाडतील असे आहेत. याआधी सोशल मीडियावर हाताने पंखा बंद करणारे बाबा, गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देणारे बाबा असे वेगवेगळे प्रकार व्हायरल झाले होते. पण आता चक्क ‘गवत बाबा’ चर्चेत आले आहेत.
पावसाळ्यात तुम्हीही आतपर्यंत आजूबाजूची हिरवळ पाहून तृप्त झाला असाल पण ही हिरवळ कधी कोणाच्या डोक्यावर पाहायला मिळेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? काहीजण जेव्हा केस कापताना “अरे त्यात काय घरची शेती आहे कधी पण उगवू” असं म्हणतात ते या गवत बाबाने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. व्हायरल गवत बाबा चक्क स्वतःच्या डोक्यावर गवत उगवून फिरताना दिसत आहेत. तुमच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा सुरुवातीला काही नाही त्यांनी केस हिरव्या रंगाने रंगवले असतील असं वाटलं पण जेव्हा स्वतः या बाबानेच आपली हुशारी सांगितली तेव्हा आम्हीही थक्क झालो.
गवत बाबा महाशय सांगतात की ते आपल्या डोक्यावर धान्य टाकून हे असं गवत उगवतात, त्यांचे डोके व केस हे या गवतासाठी माती व खताचे काम करतात. रोजच्या जसे आपण शरीरासाठी पाणी पितो तसे ते या गवतासाठी डोक्यावर ग्लासभर पाणी ओतून घेतात. काहीवेळा तर या गवताची मुळे त्यांच्या त्वचेचं आत सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी तेव्हा कित्येकदा फाटली आहे. कधी कधी यातून रक्त पण येतं. यामुळे झोपताही येत नाही, असंच बसल्या बसल्या हातावर डोकं ठेवून आराम करता येतो, असेही ते सांगतात पण तरीही देव जाणे कसली हौस म्हणून ते हा प्रकार सातत्याने करत आहेत.
Video: गवत बाबांचा भन्नाट प्रताप
हे ही वाचा<< नाल्यात वाहून गेलेल्या बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही ट्रेनमधून उतरलो कारण… “
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून “आधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आणि मग नंतर हसणं थांबत नाही” अशा प्रकारच्या कमेंट्सचा यावर वर्षाव झाला आहे. तुम्ही तरी कधी असं काही पाहायला मिळेल असा विचार केला होता का? नाही ना? म्हणूनच तर, सोशल मीडिया हा विचित्र गोष्टींचा खजिना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.