Viral Video: अ‍ॅप्पल कंपनीद्वारे निर्मित आयफोन हा जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्सपैकी एक आहे. आयफोनसह या कंपनीची सर्वच उत्पादने खूप जास्त महाग असतात. पूर्वी आयफोनची किंमत जास्त असल्यामुळे फार कमी लोक त्याचा वापर करत असत. कालांतराने आयफोनची क्रेझ वाढल्याने बरेचसे लोक अ‍ॅप्पलचे हे उत्पादन खरेदी करु लागले. असे असले तरी यूजर्स खरेदी केलेला आयफोन जीवापेक्षा जास्त जपत असतात. तो चुकून हातातून पडला, तर लोकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. यावरुन आयफोन यूजर्संची सोशल मीडियावर मस्करी केली जाते. अशाच एका आयफोन वापरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बोटीमध्ये उभा असल्याचे दिसते. त्याच्या एका हातामध्ये मोठ्या आकाराचा मासा तर दुसऱ्या हातात आयफोन आहे. तो आयफोनवरुन माश्यासह सेल्फी काढत असल्याचे किंवा व्हिडीओ कॉलवर समोरच्या व्यक्तीला मासा दाखवत असल्याचे व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते. पुढे तो हातातला मासा पुन्हा पाण्यात टाकायचा विचारात असतो. पण नकळत चुकून तो माश्याच्या जागी दुसऱ्या हातामध्ये असलेला महागडा आयफोन पाण्यामध्ये फेकून देतो. त्याला काही सेकंदातच आपली चूक लक्षात येते. आयफोन पकडण्याचा तो प्रयत्न करणार असतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

आणखी वाचा – १०८ वर्षांच्या आजीची कमाल! केरळ सरकारने घेतलेल्या परीक्षेत पटकावला प्रथम क्रमांक

हा व्हिडीओ CCTV IDIOTS या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झाले आहे. फक्त दहा सेकंदांच्या या व्हिडीओला ३.५ लाख व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. बऱ्याचजणांनी व्हिडीओखालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.