झारखंडमधील चतरा येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वयस्कर शेतकऱ्याला काही लोकांनी उठाबशा काढायला लावल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी वयस्कर व्यक्ती लोकांची माफी मागत कान पकडून उठाबशा काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. वृद्ध व्यक्तीला हे कृत्य करायला लावणाऱ्यांवर नेटकऱ्यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
वन कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओत दिसणारा वयस्कर शेतकरी जंगलातून काही लाकडे घेऊन जात होती. ज्यामध्ये काही वाळक्या लाकडाचा समावेश होता. झाडाच्या या फांद्या तो सरपण तसेच शेतीच्या कुंपणासाठी वापरणार होता. ही घटना प्रतापपूर ब्लॉकच्या नंदई जंगलात २८ जून घडल्याचं सांगितलं जात आहे. या वेळी वनविभागाशी संबंधित लोकांनी या व्यक्तीला रोखले आणि त्याला उठाबशा काढायला लावल्या, शिवाय पुन्हा जंगलातील लाकडे न नेण्याचा इशाराही दिला.
“लाजिरवाणा प्रकार”
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री रघुबर दास म्हणाले, “माफिया संपूर्ण जंगल साफ करत आहेत, त्यावेळी सरकार कुठे झोपले होते, आता गरीब आदिवासींवर असा अत्याचार करणे कितपत योग्य आहे. हे लज्जास्पद आहे.” दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश चतराच्या डीसींना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांना रिप्लाय देताना डिसींनी लिहिलं “हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर, विभागीय वन अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती स्थापन केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनाही या प्रकरणांची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “डीसी साहेब, हे प्रकरण केवळ तपासापुरते मर्यादित राहू नये, मुख्यमंत्री कारवाईबद्दल बोलत आहेत, गरिबांची चेष्टा करू नका.” दुसर्याने लिहिलं आहे की, हे वनअधिकारीच जंगलाला आतून साफ करतात आणि दिखाव्यासाठी गरीब शेतकऱ्यांवर कारवाई करतात.