जवळपास या देशातील प्रत्येक व्यक्ती दररोज सकाळी एक कप गरमागरम चहा आणि सोबत ग्लुकोजची बिस्किटं अगदी आवडीने आणि न चुकता खात असतो. बिस्किटं संपली की त्या पाकिटांचा/ रॅपरचा आपल्याला कोणताही उपयोग नसल्याने आपण ते लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. लहानपणी आपल्याला शाळेमध्ये काही प्रकल्प करण्यासाठी द्यायचे, त्यामध्ये काचऱ्यातून कला नावाचा एक प्रकल्प तर अगदी हमखास असायचा. यासाठी आपण प्लास्टिकच्या जुन्या बाटल्या, पिशव्या, कागद यांसारख्या अनेक वस्तूंचा वापर करून एखादे पेन-पेन्सिल स्टँड, भिंतीवर लावण्यासाठी वॉल आर्ट या प्रकारच्या वस्तू बनवत असू.

मात्र, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @shwetamahadik या कन्टेन्ट क्रिएटरने अशाच एक कचऱ्यात टाकून देणाऱ्या वस्तूपासून, दररोज वापरता येणारी अशी एक भन्नाट वस्तू बनवल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ चक्क बिस्किटाच्या रिकाम्या पुड्यापासून बनवलेल्या पर्सचा असल्याचे दिसते. श्वेता महाडिकला सोशल मीडियावर, ‘DIY चाची’ या नावानेदेखील ओळखले जाते. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्येही बिस्किटाच्या रिकाम्या पुड्यापासून पर्स कशी बनवली आहे ते पाहू.

हेही वाचा : DIY tips : टाकाऊपासून बनवा टिकाऊ ख्रिसमस ट्री!! ‘या’ वस्तूंचा उपयोग करा; पाहा ‘या’ भन्नाट हॅक्स

बिस्किटाचे पाकीट सर्वप्रथम कात्रीने मधोमध कापून घेतले. त्यानंतर दोन पारदर्शक प्लास्टिकच्या शीट्स घेऊन त्यामध्ये कापून घेतलेले बिस्किटाच्या पाकिटाचे कात्रण ठेवले. आता एका शिवणकाम मशीनच्या साहाय्याने दोन्ही प्लास्टिक शीट्स तीन बाजूंनी शिवून, शेवटच्या भागाला चेन आणि लाल रंगाचा बंद लावून बिस्किटाच्या रॅपरपासून पर्स बनवल्याचे दिसते.

पण, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पर्स तर बनवली, पण त्यात वस्तू ठेवता येतात का? तर उत्तर हो असे आहे. श्वेताने व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, या पर्समध्ये एक पुस्तक आणि बिस्किटाचे काही पुडे अगदी सहज ठेवता येऊ शकतात.

या भन्नाट व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रचंड पसंती दिली असून यावर अनेक कमेंट्सदेखील केलेल्या आहेत. या आगळ्या-वेगळ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहा.

“साक्षात DIY ची देवी” अशी एकाने प्रतिक्रिया दिली.” दुसऱ्याने “रिसायकल करण्याची एकदम मस्त कल्पना आहे”, असे श्वेताचे कौतुक केले आहे. “जी म्हणजे जिनियर्स, याचं सर्वोत्तम उदाहरण आहे”, असे तिसऱ्याने म्हटले. “जर ही बॅग दुकानात मिळत असती तर मी नक्कीच विकत घेतली असती”, असे चौथ्याने लिहिले. “लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या”, अशी कमेंट शेवटी पाचव्याने लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Mahadik (@shwetmahadik)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अतिशय वेगळ्या कल्पनेच्या व्हिडीओला आतापर्यंत २.२ मिलियन इतके व्ह्यूज आणि ६४.६ K लाईक्ससुद्धा मिळाले आहेत.