ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. दोन्ही देशांमधील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. मात्र खराब खेळपट्टीमुळे अनिर्णित राहिला. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया याच्यांत दुसरा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला असून या दौऱ्यातील पहिल्या विजयासाठी आतुर आहे. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी एक अनोखा प्रकार घडला. पाकिस्तानचा अझहर अली ज्या पद्धतीने बाद झाला, हा विषय सोशल मीडियावर चर्चेत आहे. पाकिस्तानकडे दोन रिव्ह्यू असताना निर्णय न घेतल्याने नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. अझहर अली हा पाकिस्तान संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज कॅमेरून ग्रीन २३व्या षटकात गोलंदाजी करत होता. कॅमेरॉन ग्रीनने पहिला चेंडू शॉर्ट टाकला आणि स्लॅम्प केला. अझहरला तो सोडायचा होता पण चेंडू त्याच्या अंगावर आदळला, त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले आणि अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट घोषित केले. अजहरने नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या अब्दुल्ला शफीकशी बरीच चर्चा केली, तोपर्यंत डीआरएस घेण्याची वेळही निघून गेली होती. रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागल्याचं दिसून आलं. अझरने रिव्ह्यू घेतला असता तर तो नाबाद राहिला असता, पण अझरने तसे केले नाही. त्यानंतर सोशल मीडियावर विचित्र पद्धतीने बाद झाल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्याची खिल्लीही उडवत आहेत.
एलबीडब्ल्यूच्या नियमांनुसार जर चेंडू हातमोजे आणि बॅटला लागला, तर फलंदाजाला नाबाद दिले जाते. चेंडू हातमोजे आणि बॅट व्यतिरिक्त शरीराच्या कोणत्याही भागावर आदळला आणि अंपायरला वाटत असेल की चेंडू सुटल्यावर थेट विकेटवर आदळेल तर अंपायर फलंदाजाला एलबीडब्ल्यू असल्याचा निर्णय देऊ शकतो.