भारतामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला. मात्र आंबा व्यवसायाला याचा विशेष फटका बसल्याचे पहायला मिळालं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे यंदा आंबा उद्योजकांना दर वर्षीप्रमाणे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करता आली नाही. मात्र त्यावरही अनेक आंबा व्यापाऱ्यांनी थेट घरपोच डिलेव्हरी करण्याचा उपाय शोधून काढला. अनेकांनी ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून पैसे स्वीकारत थेट घरपोच आंबे पुरवले. या उन्हाळ्यामध्ये आंबा विक्रीची एक आगळीवेगळी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) पाहायला मिळाली. अनेक आंबा विक्रेत्यांनी डिजीटल होत या उन्हाळ्यात व्यवसाय केला. एकीकडे असं असतानाच दुसरीकडे दुबईमध्ये मात्र आंबा विक्रीसाठी चक्क लॅम्बॉर्गीनी गाडीचा वापर होत असल्याचे वृत्त गल्फ न्यूज या वेबसाईटने दिलं आहे. आंबा हा फळांचा राजा असल्याने त्याला राज्यासारखी वागणूक देण्याच्या उद्देशाने आंब्याची घरपोच डिलेव्हरी थेट लॅम्बॉर्गिनीमधून केली जात आहे.
दुबईमधील पाकिस्तानी सुपरमार्केटमधून आंब्यांची घरपोच डिलेव्हरी देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र हे आंबे घरी आणून देण्यासाठी डिलेव्हरी करणारी व्यक्ती चक्क लॅम्बॉर्गिनीमधून येते. “राजाचा प्रवास राजा सारखा झाला पाहिजे,” असं या सुपर मार्केटचे व्यवस्थापकीय अधिकारी असणारे मोहम्मद जेहनझाब सांगतात. मोहम्मद स्वत: आंब्याची डिलेव्हरी द्यायला जातात आणि ते ग्राहकांना एक छोटी राइडही मोफत देतात. मात्र यासाठी आंब्याची ऑर्डर ही किमान १०० द्राम्स म्हणजेच १९०० रुपयांची असणं गरजेचं आहे. मात्र आपण हे पैशासाठी करत नसल्याचं मोहम्मद सांगतात.
“लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आणि त्यांना खास वाटावं यासाठी मी हे करतो,” असं २७ वर्षीय मोहम्मद सांगतात. मागील आठवड्यामध्ये फेसबुकच्या पेजवर त्यांनी ‘मँगो इन लॅम्बॉर्गिनी’ अशी जाहिरात केली होती. या ऑफरअंतर्गत मागील काही दिवसांमध्ये अनेक ग्राहकांनी मोहम्मद यांच्याकडे ऑर्डर दिल्या आहेत. मोहम्मद यांच्याकडून लॅण्बॉर्गिनीमधून आंब्यांची डिलेव्हरी घेतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. दुबईमध्ये या गाडीची किंमत १.२ मिलीयन द्राम्स इतकी आहेत.
The #Pakistani supermarket in #Dubai delivered #AnwarRatol and #Chaunsa mangoes to my house in a #Lamborghini pic.twitter.com/d1TkFGeXkN
— Musfir Khawaja (@Khawaja_Jeee) June 18, 2020
“आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंबे ऑर्डर करणाऱ्यांच्या शेजाऱ्यांना मी खरोखर एवढ्या महागड्या गाडीमधून आंबे देण्यासाठी आलोय यावर विश्वास बसत नाही. आंब्यांबरोबरच मोफत फेरफटका हा फक्त मुलांसाठी होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसून मुलं कंटाळल्याने मी त्यांना फिरवून आणायचो. मात्र इतर लोकही यामध्ये खूपच उत्साहाने सहभागी होत आहेत. एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी एक तास लागतो. आम्ही दिवसाला ७ ते ८ घरांमध्ये आंबे पोहचवतो. लवकरच आम्ही हा आकडा १२ पर्यंत नेण्याचा प्रयत्न करु,”
