Mumbai ganeshostav video:६ सप्टेंबर हा विसर्जनाचा दिवस असून, शहरातील विविध ठिकाणी भक्तानी उत्साहाने गणपतीची पूजा पूर्ण केली. काही ठिकाणी भक्तांनी आनंदात वादन केले, तर काही ठिकाणी मिरवणुका रंगल्या. मात्र, काही ठिकाणी अति उत्साहामुळे वादविवादही झाले, जे लोकांच्या नजरेस पडले. मुंबईत एका जोडीने गणपती विसर्जन मिरवणूक थांबविताना घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये मोठ्या आवाजावरून होणाऱ्या वादविवादांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

या पालकांनी असा दावा केला की, मिरवणुकीदरम्यान वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या ढोलांच्या आवाजाचा त्यांच्या चार महिन्यांच्या बाळाला त्रास होत होता आणि म्हणूनच त्यांनी विसर्जन रॅलीमध्ये सहभागी भाविकांना थांबवले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला तिच्या परिसरातील मिरवणुकीजवळ धावत आली आहे, जिथे ढोल-ताशा वाजवत होते आणि तिचा पती तिच्या मागे आहे, जो व्हिडीओ रेकॉर्ड करीत आहे. या दाम्पत्याने थेट हस्तक्षेप करत ढोल वाजवणे थांबवावे, अशी मागणी केली.

व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, ती महिला रागावलेली आहे आणि ती भाविकांना सांगते की, एक तासापासून खूपच जास्त आवाज होत आहे आणि तिच्या बाळासाठी हे त्रासदायक आहे. ती म्हणते, “हे खूप जास्त आहे. मी चार महिन्यांच्या बाळाची आई आहे. तुम्ही एक तासापासून खूप मोठ्याने आवाज करीत आहात.” तिचा पतीदेखील तेच सागंतोय. तो म्हणतो, “तुम्हाला प्रत्येक वर्षी सांगावे लागते.” वाद वाढत असताना, एका भाविकाने त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या जोडप्याने आवाजाबाबत आपली नाराजी व्यक्त करीत मिरवणूक पुढे विसर्जनाच्या ठिकाणी नेण्याची मागणी केली. दरम्यान, आणखी एक महिला परिस्थिती शांत करण्यासाठी पुढे आली; पण त्या आईने पुन्हा तिच्याशी तीव्र वाद घातला. महिलेच्या पतीनेदेखील भाविकांना आठवण करून दिली की, ध्वनिप्रदूषणाविरुद्ध स्पष्ट कायदे आहेत, विशेषतः रात्रीच्या वेळेस किंवा रहिवासी परिसरात मिरवणुका काढताना. त्याने सांगितले की, पत्नीला या मुद्द्यावर तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याशिवाय तो मराठीत उपस्थितांना विनंती करताना दिसतो की, . मिरवणूक पुढे विसर्जनाच्या ठिकाणी नेण्यात यावी.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटिझन्स त्या जोडप्याच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि त्यांनी आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. तसेच त्यांनी उत्सवात आवाजाचे नियम काटेकोर पाळण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. तर काही लोकांनी मिरवणूक थांबवण्यावर टीका केली आहे आणि सांगितले की, गणपती उत्सवाची धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची परंपरा असून, ती दरवर्षी पाळली जाते.

सध्या हे स्पष्ट झालेले नाही की, हा व्हिडीओ नेमका कुठे आणि कधी शूट केला गेला होता. तसेच, याबाबत कोणतीही पोलीस तक्रार केली गेलेली नाही किंवा कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे की नाही, याचीही माहिती नाही.