Shocking viral video: चेहऱ्यावरून साधी दिसणारी माणसंही इतकी चलाख असतील याचा अंदाजही कदाचित येत नसेल. पण अशीच साधी दिसणारी माणसं काही वेळा अट्टल गुन्हेगारासारखी कृती करतात. असाच एक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील एका दागिन्यांच्या दुकानात तब्बल ६ लाखांचं सोनं दिवसाढवळ्या चोरीला गेलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. यामध्ये एक जोडपे अतिशय चलाखीने सोन्याचे दागिने लपवताना दिसत आहे. ग्राहक म्हणून या जोडप्याने दुकानात प्रवेश केला आणि दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानदाराला चांगलाच गंडा घातला.

तर झालं असं की, हे जोडपे दागिन्यांच्या दुकानात गेल्यावर त्यांनी सोन्याचे हार पाहायला सुरूवात केली. या महिलेने दागिन्यांकडे पाहताना, हाताळताना कधी एक सोन्याचा हार लपवला हे दुकानदाराच्याही लक्षात आले नाही.

सीसीटीव्हीमध्ये नेमके काय दिसले?

हा सर्व प्रकार घडून गेल्यानंतर सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. सोन्याचे हार पाहताना त्या महिलेने अगदी शांतपणे दुकानदाराची नजर चुकवून तिच्या ओट्यात सोन्याचा हार घेतला. तसंच संशय येऊ नये म्हणून तिने दुसरा हार हातात घेतला. त्यानंतर चोरलेला दागिना तिने तिच्या साडीखाली ठेवला आणि तो काही क्षणांतच नजरेआड केला. इतर दागिने जास्त आवडले असे भासवून तिने चोरीचा हा तिच्या हाताखाली लपवला.

त्यानंतर बराच वेळ ते जोडपे दुकानदाराला दागिन्यांच्या किमतीबद्दल विचारपूस करत राहिले. मात्र, यातले कुठलेच दागिने आवडले नाही असे त्यांनी सांगितले आणि ते दुकानातून निघून गेले.

दुकानाच्या शेवटच्या दिवसांत इन्व्हेंटरी मोजणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. कर्मचाऱ्यांनी नंतर दागिन्यांचे वजन केले, तेव्हा कमतरता असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना व्हिडीओ देखरेखीची तपासणी करावी लागली आणि त्यातून हा चोरीचा प्रकार समोर आला.

दरम्यान, पोलिसांकडे दुकानदाराने तक्रार केल्यावर या जोडप्याचा शोध सुरू केला आहे.