आपल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी, ते सतत मोटिव्हेटेड राहावेत यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. कर्मचाऱ्यांनी मन लावून काम केल्याने कंपनीसाठी फायदेशीर असते. यासाठी जगभरातील कंपन्या लकी ड्रॉ, बोनस यांच्याद्वारे कर्मचाऱ्यांना खूश करायचा प्रयत्न करत असतात. अशाच प्रकारे चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. करोना महामारीमुळे मागील ३ वर्षांपासून कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य झाले नसल्याने लकी ड्रॉच्या निमित्ताने बरेचसे कर्मचारी एकत्र जमले होते. या लकी ड्रॉमध्ये एका नशीबवान कर्मचाऱ्याला बक्षीस म्हणून ३६५ दिवसांसाठी पगारी रजा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
बीएफएम न्यूजने ट्विटरवर या संबंधित ट्वीट शेअर केले आहे. यामध्ये चीनमधील एका कर्मचाऱ्याला वार्षिक पार्टीदरम्यान झालेल्या लकी ड्रॉमध्ये ३६५ दिवसांची पगारी रजा मिळाली असल्याचे सांगितले आहे. या कर्मचाऱ्यांच्या नावाबाबतची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. बीएफएम न्यूजच्या ट्वीटमध्ये त्या कर्मचाऱ्याचा चेक हातात घेतलेला फोटो देखील जोडण्यात आलेला आहे. त्या चेकवर ‘365 days of paid leave’ असे लिहिले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. लकी ड्रॉच्या निकालाची घोषणा झाल्यावर त्या कर्मचाऱ्याला आपण हे बक्षीस जिंकलो आहोत यावर विश्वास बसत नव्हता.
बीएफएम न्यूजच्या अहवालानुसार, या लकी ड्रॉमध्ये पेनल्टीचा देखील समावेश करण्यात आला होता. जर एखाद्या व्यक्तीला पेनल्टी लागली, तर त्याला चिठ्ठीमध्ये लिहिलेले काम करावे लागणार होते. लकी ड्रॉमध्ये एक-दोन दिवसांच्या पगारी रजेचा देखील समावेश होता. जर एखाद्याला सुट्टी नको असेल, तर तो त्याला बदल्यात पैसे दिले जाणार होते.
चीनमधील या लकी ड्रॉ संबंधित बातमीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. अनेक यूजर्सनी गंमतीने या कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय करावे लागेल असे म्हटले आहे. तर काहीजणांनी हा संपूर्ण प्रकार खोटा असल्याचा दावा केला आहे.