लहानपणी ऐकलेल्या ‘अरेबियन नाइट्स’ या प्रसिद्ध ग्रंथातल्या गोष्टींची जादू टिकून आहे. या गोष्टींमध्ये अलाद्दिन आणि त्याच्या जादुई दिव्याची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. आतापर्यंत गोष्टीमध्ये ऐकलेला अलाद्दिन कार्टून किंवा सिनेमाच्या रुपातून तुम्ही पाहिला असेल. अरेबियन नाइट्समधला हा अलाद्दिन त्याच्या हवेमध्ये उडणाऱ्या चादरीसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरला आहे. दिल्लीजवळील गुरुग्राम या ठिकाणी अलाद्दिन अवतरला असून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडीओमध्ये अलाद्दिन सारखे कपडे घालतेला एक तरुण गुरुग्राममध्ये फिरताना दिसत आहे. रस्त्यावरुन फिरताना तो येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यामधील लोकांना हात दाखवत आहे. त्याशिवाय तो मॅकडीमध्ये जाऊन आईसक्रीम खात लहान मुलांशी खेळतानाही दिसतो. अलाद्दिन बनून फिरणाऱ्या या तरुणाचे नाव केविन कॉल असे आहे. प्रॅंक करण्यासाठी त्याने हा गेटअप केल्याचे म्हटले जात आहे. त्याने इलेक्ट्रिक स्केटबोर्ड वापरुन हवेत उडणाऱ्या चादरीची प्रतिकृती बनवली आहे. जमिनीवर उतरुन तो चादरीला पुढे-मागे जाण्याचा इशारा करत असल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. रस्त्यावरुन फिरताना अलाद्दिनच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष केविनने वेधले आहे. मोठ्या माणसांना हा प्रॅंक आहे हे कळत असले तरी लहान मुलांना खराखुरा अलाद्दिन आला आहे असे वाटले असेल.
हा व्हिडीओ केविनने मागच्या वर्षी शेअर केला होता. व्हिडीओमध्ये त्याने मास्क लावला आहे असे दिसते. यावरुन हा व्हिडीओ करोना काळात बनवला होता असा अंदाज लावला जात आहे. आता पुन्हा एकदा या व्हिडीओची चर्चा होत आहे. लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत, लाइक करत आहेत. अनेकांनी आपल्या मित्रांना हा व्हिडीओ शेअर केला आहे. पुन्हा व्हायरल झाल्यानंतर यूजर्स व्हिडीओवर कमेंट करत आहेत. असाच अलाद्दिन काही महिन्यांपूर्वी दुबईमध्येही दिसला होता. RhyzOrDie या यूट्यूब चॅनलवर दुबईतल्या अलाद्दिनचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.