Shocking video: आरोग्यदायी खा आणि निरोगी राहा असा सल्ला सगळेच देतात मात्र हेच आरोग्यदायी खाणं कुठे मिळतं असा प्रश्न सध्या सगळ्याच गृहिणींना पडतो. त्याच कारणं असं की आता बाजारात असा कोणताच पदार्थ राहिलेला नाही ज्यात भेसळ नाही. अगदी फळं आणि भाजी पाल्यातही मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसते. बाजारातून फळं विकत घेताना आपल्याला आरोग्यदायी आणि फळं मिळतील, असा आपला विश्वास असतो. मात्र, एका धक्कादायक व्हिडीओमुळे हा विश्वास पुन्हा डळमळीत झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या केळीचा दाखवण्यात आला आहे. यामुळे बाजारात सहजपणे नकली फळं विकली जात आहेत हे समोर आलेले आहे. ज्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
फळं खाल्ली पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- बाजारात अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेली फळं आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक फळं घेतात की आजार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून फळं थेट झाडावरूनच आणायची का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट फळंही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये केळी कृत्रिमरीत्या अवघ्या ५ मिनिटांत कशी पिकवली जाते याची प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही केळी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका विक्रेत्याला पोलिसांनी पकडलं आहे. यावेळी तो कशाप्रकारे ग्राहकांना फसवून केळींची विक्री करतोय हे त्यालाच दाखवायला सांगितलं. यावेळी त्यानं जे दाखवलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसले. आपण आरोग्यदायी म्हणून जी केळी खातोय ती आपल्या आरोग्यासाठी किती हानीकारक ठरु शकते हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विक्रेता दाखवत आहे, सुरुवातीला तो केमिकलने भरलेल्या बादलीमध्ये न पिकलेली केळी टाकतो पाच मिनिटं थांबा असं सांगतो आणि खरंच अवघ्या ५ मिनिटांतच हिरवी केळी पिवळी धम्मक होते. पिवळी छान पिकलेली म्हणून हीच केळी आपण विकत घेतो आणि खातो.
पाहा व्हिडीओ
हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” “जगायचं की नाही” अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यांसारख्या मूलभूत वस्तूंमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, आता थेट भाज्यांमध्येही भेसळ होत असल्याचं उघड झाल्यानं खवय्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.