लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि हास्याने भरलेला उत्सव असतो. पण कधीकधी, हास्य आणि मौजमजेच्या मधोमधही अशा काही घटना घडतात, ज्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेतला जातो. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बैल अचानक गर्दीने भरलेल्या लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो आणि काही क्षणातच गोंधळ उडतो. पाहुणे, नातेवाईक सगळेच जीवाच्या भीतीने इकडेतिकडे पळू लागतात.

लग्नाच्या मंडपातील हा व्हिडीओ आनंदी वातावरणात एक अनपेक्षित घटना घडली आहे हे दाखवतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये लोक लग्न समारंभाचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. काही पाहुणे जेवणात मग्न असतात, काही स्टेजजवळ फोटो काढत असतात. पण, अचानक मंडपाच्या एका बाजूने एक बैल धावत येतो आणि सर्वांना धक्का बसतो.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बैल मंडपामध्ये प्रवेश करताच लोक त्यांच्या खुर्च्यांवरून उठतात आणि वेगवेगळ्या दिशेने पळू लागतात. काही जण लहान मुलांना उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात, तर काही जण स्टेजच्या मागे लपतात. काही सेकंदांसाठी संपूर्ण वातावरण गोंधळाचं होतं. तथापि, काही तरुणांनी धैर्य दाखवत एकत्र येऊन बैलाला बाहेर हाकलून लावलं. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही, पण मंडपामधील सजावट आणि खुर्च्यांची पार गडबड झाली.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. अनेकांनी या घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “बैलालाही वाटलं असेल की नवरी नवरदेवाला आशीर्वाद द्यायला जावं!” तर दुसऱ्याने विनोद करत लिहिलं, “बैलही लग्नात नाचायला आला होता बहुतेक!” मात्र, काही युजर्सनी या घटनेकडे गंभीरतेने पहात लिहिलं की, अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा आणि प्राणी नियंत्रण याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. प्राण्यांनाही भीती वाटते, त्यामुळे त्यांना गर्दीपासून दूर ठेवायला हवं.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ rai_haan2221 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ काही क्षणांतच हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रिया आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका बाजूला लोक या प्रसंगावर हसताहेत, तर दुसरीकडे हा व्हिडीओ सतर्कतेचा इशारा देऊन जातो की, कोणतंही सार्वजनिक आयोजन असो, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करता कामा नये.