नको असलेलं मूल माता-पित्यांनी किंवा अविवाहित मातांनी सोडून देण्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. मात्र, एका १८ वर्षांच्या अविवाहित मातेनं आपल्या नवजात अर्भकाला कचऱ्याच्या पेटीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत. काळीज पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच, अविवाहित किंवा एकल मातृत्वाचा मुद्दा देखील यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, हे अर्भक नंतर कचरा वेचणाऱ्या एका महिलेला सापडलं असून त्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ म्हणजे एक सीसीटीव्ही फूटेज असून ते ७ जानेवारीचं असल्याचं दिसत आहे. दुपारी दोन वाजल्याचं देखील फूटेजवरील वेळेवरून स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाची वोक्सवॅगन जेट्टा कार एका कचऱ्याच्या पेटीजवळ थांबल्याचं दिसत आहे. या गाडीतून एक महिला उतरली आणि तिने काळ्या पिशवीत ठेवलेलं काहीतरी कचऱ्याच्या पेटीत फेकलं. ज्या वेगाने ही महिला गाडीतून बाहेर उतरली, त्याच वेगाने पुन्हा आत बसली आणि गाडी निघून गेली!

दरम्यान, तब्बल ६ तासांनंतर म्हणजे संध्याकाळी ८ च्या सुमारास कचरा वेचणाऱ्या तीन जणांनी या कचरापेटीतून बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याचं ऐकलं. त्यांनी लागलीच ती काळी पिशवी बाहेर काढली असता त्यामध्ये अवघ्या काही तासांचं एक अर्भक रडत असल्याचं दिसलं. यातल्या एका महिलेने तातडीने त्या बाळाला एका रुमालामध्ये गुंडाळलं आणि त्याला छातीशी कवटाळून ठेवलं.

या बाळाला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नेमकं घडलं काय?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यामागची खरी कहाणी समोर आली आहे. हा व्हिडीओ न्यू मेक्सिकोमधला आहे. अॅलेक्सीस अविला असं संबंधित १८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर घडला प्रकार समोर आला.

अॅलेक्सिस अविलानं आपणच बाळाला कचऱ्याच्या पेटीत फेकल्याचं कबूल केलं आहे. त्या वेळी काय करावं, हेच आपल्याला कळलं नसल्यामुळे आपण असं केल्याचं अविलानं कोर्टाला सांगितलं. काही महिन्यांपूर्वीच अविलानं तिच्या प्रियकरासोबत अर्थात त्या बाळाच्या वडिलांसोबत ब्रेकअप केलं होतं. अविलाचा प्रियकर देखील अल्पवयीन आहे. पण अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत अविलाला आपण गर्भवती असल्याचं माहितीच नसल्याचं तिनं कोर्टाला सांगितलं. पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन आपण दवाखान्यात गेलो असता गर्भवती असल्याचं समजल्याचं तिनं सांगितलं.

सोमवारी सकाळी अविलानं तिच्या घरी बाथरूममध्ये या बाळाला जन्म दिला. त्या वेळी अविलाला काय करावं हे न समजल्यानं तिनं सरळ अर्भकाला एका पिशवीत टाकलं. ती पिशवी एका काळ्या पिशवीत टाकली आणि गाडीत नेऊन थेट कचरा पेटीमध्ये फेकलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनावणी, जामीन आणि शिक्षा..

दरम्यान, अविलाला स्थानिक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तिच्यावर लवकरच खटला चालणार असून या गुन्ह्यासाठी अविलाला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे अविलाच्या पालकांना देखील ती गर्भवती असण्याविषयी किंवा तिने बाळाला जन्म दिला असण्याविषयी काहीही माहिती नाही!