Viral Video: अलीकडे फक्त चष्म्याला पर्याय म्हणून नाही तर डोळे सुंदर दिसावे यासाठीही अनेकजण कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. तुम्हाला जर याने आत्मविश्वास वाढल्याचे वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही पण मंडळी योग्य ती काळजी न घेता लेन्स वापरणं पथ्यावर पडू शकतं. दिवसभर दमून आल्यावर काहीजण रात्री लेन्स न काढताच झोपायला जातात पण असाच काही मिनिटांचा आळस एका महिलेला महागात पडला आहे. अलीकडेच समोर आलेल्या एका प्रकरणात महिलेच्या डोळ्यातून डॉक्टरांनी चक्क २३ कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या आहेत. इतक्या लेन्स डोळ्यात असताना महिलेला जाणवलं ही नाही का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना पण त्यावर या महिलेने जे उत्तर दिले आहे ते पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल.
डॉ. कॅटेरिना कुर्तिवा नावाच्या डॉक्टरने एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात डॉक्टर महिलेच्या डोळ्यातून एका मागोमाग एक अशा २३ कॉन्टॅक्ट लेन्स काढताना दिसत आहेत. “हा व्हिडीओ अगदी खरा आहे, झोपताना चुकूनही लेन्स काढायला विसरू नका” असे कॅप्शन देत डॉक्टरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
डॉ. कॅटेरिना कुर्तिवा यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओमधील महिला ही रोज रात्री झोपताना लेन्स काढायला विसरायची. बरं सकाळी उठूनही तिच्या लक्षात न आल्याने ती २३ दिवस सलग रोज डोळ्यात नवे लेन्स घालत गेली, शेवटी जेव्हा डोळे चुरचुरायला लागतात तेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि मग क्लिनिकमध्ये हा सर्व प्रकार उघड झाला.
डॉक्टरांनी दुसर्या पोस्टमध्ये प्रक्रियेचे फोटो शेअर करत डॉक्टरांनी पुढे लिहिले, “मी सर्व कॉन्टॅक्ट लेन्स काळजीपूर्वक वेगळे केले आहेत कॉन्टॅक्ट लेन्स वेगळे करण्यासाठी मला एक अतिशय सूक्ष्म शस्त्रक्रिया करावी लागली. महिनाभर पापणीखाली हे लेन्स एकमेकांना चिकटले होते.” अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Video: तू असशील राजा पण मी..! सिंह मगरीला फरफटत नेताना, मगरीने इंगा दाखवला, बाजूची सिंहीणही हादरली
दरम्यान हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर आतापर्यंत याला २.९ मिलियन म्हणजेच तब्बल २९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत तसेच व्हिडिओला ८१ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत महिलेचा विसरभोळेपणा पाहून विश्वासच बसत नाही असे म्हंटले आहे. तर काहींनी हे बघून माझं तोंड आश्चर्याने बंदच होत नाही अशी मजेशीर तक्रार डॉक्टर कॅटेरिना यांच्याकडे केली आहे.