IIT Viral Video : भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटीचे नाव नेहमीच उच्च स्थानावर घेतले जाते. आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. त्यामुळे एकदा का एखाद्या विद्यार्थ्याला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला की, त्याचे भविष्य उज्ज्वल ठरते, असे मानले जाते. परंतु, आयआयटी म्हणजे फक्त पुस्तकांचा आणि अभ्यासाचा विषय नाही, तर येथे शिकणारे विद्यार्थी त्यांच्या कौशल्याने, कलागुणांनी व विविध छंदांमुळेही ओळखले जातात. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे आयआयटी रुरकीतील एका विद्यार्थिनीचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ आयआयटी रुरकी कॅम्पसचा असल्याचे सांगितले जाते. एका विद्यार्थिनीने ‘जलेबी बाई’ या लोकप्रिय गाण्यावर अप्रतिम नृत्य केले असून, त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स रीलच्या स्वरूपात यूट्यूब व इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.विद्यार्थिनीचे नृत्य पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. तिच्या प्रत्येक हालचाली, स्टेप्स व एक्स्प्रेशन्स गाण्याच्या तालाशी जुळत आहेत.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी विद्यार्थिनीच्या नृत्यकौशल्याचे मनापासून कौतुक केले आहे. इतक्या जबरदस्त पद्धतीने गाण्याच्या तालावर नृत्य करणे सोपे नाही, अशा प्रतिक्रिया सकारात्मक प्रेक्षकांकडून आल्या. मात्र, काहींनी नकारात्मक कमेंट्स करीत विद्यार्थिनीवर टीका केली. काही लोकांना असे वाटले की, अशा संस्थेत नृत्यासारख्या गोष्टींना स्थान नाही.

परंतु, या कमेंट्सवर अनेकांनी उलट उत्तर दिले – “ज्यांना टीका करायची आहे, ते या मुलीइतके हुशारही नाहीत. कारण- आयआयटीमध्ये प्रवेश घेणे हीच मोठी गोष्ट आहे.” विद्यार्थिनीची मेहनत आणि तयारी, नृत्यातील प्रत्येक स्टेपमध्ये दिसणारी सफाई आणि आत्मविश्वास पाहता, ही विद्यार्थिनी नृत्यकलेतही उत्तम असल्याचे स्पष्ट दिसते.

आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झालेली तयारी आणि त्याचबरोबर नृत्याची आवड व सराव या दोन्हींचा मिलाफ तिच्या परफॉर्मन्समध्ये दिसून येते. त्यामुळेच हा व्हिडीओ इतक्या झपाट्याने लोकांच्या मनाला भिडला आहे. आयआयटी म्हणजे बर्‍याचदा लोकांच्या मनात असा समज असतो की, आयआयटी म्हणजे फक्त अभ्यास, प्रयोगशाळा व कठीण स्पर्धा.

पण हा व्हिडीओ त्याचे वेगळे चित्र दाखवतो. आयआयटीतील विद्यार्थी केवळ अभ्यासातच नाही, तर कला, क्रीडा, नृत्य, संगीत अशा क्षेत्रांतही आपले कौशल्य दाखवतात. आजच्या सोशल मीडिया युगात कोणत्याही क्षणी कुणाचाही व्हिडीओ, फोटो किंवा विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. आयआयटी रुरकीच्या या विद्यार्थिनीच्या नृत्याचा हा व्हिडीओ हे त्याचेच एक उदाहरण आहे. एका बाजूला कौतुकाचा वर्षाव, तर दुसऱ्या बाजूला टीका. या दोन्हींचा सामना तिने शांतपणे केला आहे. परंतु, एक गोष्ट नक्की की, अभ्यासात हुशार आणि कलेत उत्तम असलेली ही विद्यार्थिनी आज लाखो लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे