Dadar Shivaji Park Deepotsav Viral Video: सध्या सगळीकडे दिवाळीचा सण जल्लोषात साजरा केला जातोय. कुठे रांगोळीची आरास तर कुठे फटाक्यांचा धुमधडाका सुरू आहे. काही जण दिवे लावून, तर काही जण फटाके फोडून हा सण साजरा करतात. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. अशातच अनेक जण फटाके फोडताना स्टंट करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात होऊन, लोक जखमी होतात; तर काहींचं मोठं नुकसान होतं. परंतु, तरीही मजा-मस्ती म्हणून काही जण अशी स्टंटबाजी दरवर्षी करतच असतात आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतानादेखील आपण पाहतो.

व्हायरल व्हिडीओ (Shivaji Park Video)

दरवर्षी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्त दिपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मोठ्या प्रमाणात शोषणाई, डेकोरेशन करून या ठिकाणी अनेक जण फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी जमतात. पण सध्या या पार्कात फटाक्यांमुळे एका महिलेचं भलंमोठं नुकसान झाल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, पार्काच्या बाहेर एक कार आहे आणि त्या कारची मागची काच पूर्णपणे फुटली आहे. कार पाहून महिला त्रस्त झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतंय. फटाक्यांमुळे कारचं एवढं मोठं नुकसान झाल्याचं व्हिडीओच्या कमेंटमध्ये नेटकरी म्हणतायत. पण नेमकं काय घडलं हे अद्याप कळू शकलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @dadarmumbaikar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “गाड्या लावताना काळजी घ्या” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओला तब्बल ४९७ k व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “उत्सव साजरा करा पण लोकांच्या वाहनाचे नुकसान करू नका. आपला आनंद दुसऱ्यासाठी दुःख नसावे” तर दुसऱ्यानं “पार्कात यायला गाडी कशासाठी पाहिजे, आणली तर बघताय ना किती ट्रॅफिक. आणली तर ती बी एम सी च्या पार्कींग लॉट मध्ये लावली पाहिजे, राज साहेब याचा पण तोडगा काढा आणि मराठी माणसांना या बद्दल आवाहन करा” अशी कमेंट केली.