सोशल मीडियावर काय कधी आणि कसं व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी प्रेरणादायी विचार तर कधी जंगलामधील शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही वेळेस एखाद्या विशिष्ट घटनेचे तर कधी अंगावर रोमांच उभे करणारे व्हिडीओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पुण्यामधील टाटा मोटर्सच्या कारखान्यातील असल्याचा दावा केला जातोय.
सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार हा व्हिडीओ टाटा सफारी या गाडीचं १० हजारावं मॉडेल तयार करुन कारखान्याबाहेर काढण्यात आलं त्यावेळी या घोषणा देण्यात आल्या. “टाटा मोटर्सच्या संस्कृतीचे अजून एक उत्तम उदाहरण… टाटा कंपनीच्या टाटा सफारी या मॉडेलची दहा हजारावी गाडी कारखान्याबाहेर पडताना छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद देत असेम्बली लाइनवरुन बाहेर काढण्यात आली,” अशा मजकुरासहीत हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
“प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…” अशी गारद एका महिलेने दिल्याचं या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. ही गारद देताना सर्वजण जय असं एक सुरात आवाज देतात. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटामध्ये गाडी असेम्बली लेनवरुन बाहेर पडताना दिसते.
हा व्हिडीओ अनेक पेजेसवर व्हायरल झालेला असला तरी तो नक्की कुठला आहे यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही जणांच्या सांगण्यानुसार हा व्हिडीओ पुण्यातील चाकणमधील प्लॅण्टमधला असल्याचं सांगण्यात येतंय तर काहींनी हा व्हिडीओ एका शोरुमच्या उद्घाटनाच्या वेळेचा असल्याचं म्हटलंय.
व्हिडीओ कुठलाही असला तरी कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि त्यांनी दिलेली अनोखी मानवंदना अभिमाने अंगावर काटा आणणारी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय.