Viral Video Cop Saves Puppy : प्रत्येक सणांदरम्यान खाकी वर्दी घालून पोलिस अधिकारी नेहमीच नागरिकांचे रक्षण करतात. स्वतःची सुखं-दुःख बाजूला ठेवून नेहमी आपल्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होतात आणि चोवीस तास न डगमगता नागरिकांची सेवा करण्यासाठी तयार असतात. फक्त माणसांची नाही तर प्राण्यांचीही काळजी घेत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने नाल्यात अडकलेल्या एका पिल्लाला वाचवले आहे.

तामिळनाडूमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून नाल्यात अडकलेल्या एका पिल्लाला वाचवले. नाहिदा बानू यांनी शेअर केलेल्या या छोट्या व्हिडीओमध्ये, पिल्लाची चिंताग्रस्त श्वान आई पोलीस अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांवर विश्वास ठेवून नाल्याजवळ उभी आहे. मग पोलीस अधिकारी आणि नागरिकांनी मिळून एक दोर तयार केला मग पाण्याच्या पाईपला बांधून नंतर तो खड्ड्यात टाकला. यादरम्यान, पोलिसाने त्याच्या फोनच्या टॉर्चचा वापर करून नाल्यात प्रकाश दिला. त्यानंतर पिल्लाभोवती दोरा काळजीपूर्वक अडकवला.

पिल्लाने नकळत धरले पोलिसांचे पाय (Viral Video)

त्यानंतर सगळ्यांनी मिळून पिल्लाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर आई आणि तिच्या पिल्लाचा पुन्हा एकदा भेट झाली; जे पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. यादरम्यान पिल्लाने नकळत पोलिसांच्या बूटाजवळ नकळत जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि पुन्हा एकदा माणुसकीचा विजय झाला. प्राण्यांचे मन नाजूक असते. ते बोलू शकत नाहीत. फक्त हावभावांनी मनातील भावना सांगतात आणि समजून सुद्धा घेतात. एकदा बघाच व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

व्हायरल व्हिडीओ…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @naheedhabanu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “माणुसकी अजूनही जिवंत आहे”, “पिल्लाने नकळत पोलिसांचे पाय धरले हे पाहून खूप छान वाटले”, “श्वान आई ज्या पद्धतीने माणसांवर विश्वास ठेवून उभी आहे; त्यावरून प्राणी आपल्यावर किती अवलंबून असतात हे दिसून येते, त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.