Viral Video: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा काळ खूप लाखमोलाचा असतो. प्रत्येक इयत्तेत नवीन अभ्यासक्रम, विषय, शिक्षक, मित्र-मैत्रिणी भेटतात आणि मजा-मस्तीही करायला मिळते. सुरुवातीला नकोशी वाटणारी शाळा शालेय शिक्षण संपताना हवीहवीशी वाटू लागते. दरम्यान, आता एका शाळेतील छोट्या विद्यार्थ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
हल्ली सोशल मीडियावर शाळेतील मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात, ज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी काही मुलं रडताना दिसतात. काही जण रडता रडता शिक्षकांना मजेशीर कारणं देताना दिसतात. लहान मुलांचं हे निरागस बोलणं सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं. आतादेखील अशाच एका चिमुकल्याचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटा विद्यार्थी वर्गात बसला आहे. यावेळी त्याची शिक्षिका त्याला “तू शाळेचा गणवेश कधी आणणार आहेस”, असा प्रश्न विचारते. त्यावर तो चिमुकला म्हणतो, “पैसे नाहीत ना.” त्यावर शिक्षिका म्हणते, “कुठे गेले पैसे?” मग तो चिमुकला, “माझ्या बाबांकडे पैसे नाहीत. त्यांच्याकडे पाच रुपये आहेत. मी शाळेत आलो की, ते मला पाच रुपये देतात”, असं म्हणत हसतो. चिमुकल्याचं ते निरागस बोलणं ऐकून अनेक जण कमेंट्स करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sarika.makar.169 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “किती निरागस चेहरा आहे याचा.” दुसऱ्यानं लिहिलंय, “माझ्या बाबाकडे नाहीत ना पैसे, एक्स्प्रेशन कमाल आहेत.”