Women And Rapido Rider Heartwarming Video : रॅपिडो कंपनी अॅपवर आधारित बाइक, कॅब्स, टॅक्सी, रिक्षाद्वारे ग्राहकांना सेवा पुरवते. रॅपिडोची ही सेवा भारतातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. पण. अनेकदा प्रवासी आणि रॅपिडो चालकांमध्ये पैशांवरून, वागणुकीवरून मतभेद होतानाही दिसून आले आहेत. त्यामुळे रात्री एकट्याने प्रवास करणे खासकरून महिलांसाठी असुरक्षित ठरते आहे. पण, आज एका महिलेसाठी रॅपिडो राईडचा अनुभव खास ठरला आहे.
एका महिलेने रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी रॅपिडो बाईक बुक केली. त्यानंतर रॅपिडो चालक आला आणि मग राईड सुरु झाली. पण, थोड्या अंतरानंतर सगळं बदललं आणि रात्री १ वाजता ती घरी पोहचली. मग या सगळ्या प्रवासाबद्दल तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांच्या राईड दरम्यानचे काही फुटेज होते.
महिला रॅपिडो बाईकवर बसली तेव्हा तिच्या फोनची बॅटरी ६ टक्के होती. त्यामुळे महिलेने लवकरात लवकर घरी पोहचवण्याचा सल्ला रॅपिडो चालकाला दिला. पण, काही किलोमीटर चालल्यानंतर, एक खड्डा समोर आला आणि बाईकला जोरदार धक्का बसला; त्यामुळे गाडीची चेन तुटली. अंधार होता, रस्ते रिकामे होते आणि जवळपास कोणतीही दुकाने नव्हती.
व्हिडीओ नक्की बघा…
“तू घाबरू नकोस, मी तुला घरी सोडेन’ (Viral Video)
अशावेळी साधारणपणे, रॅपीडो राईड रद्द करावी लागते किंवा पुन्हा बुक करावी लागते. पण, चालकाने यापैकी काहीही न सांगता. “तू घाबरू नकोस, मी तुला घरी सोडेन’ असे अगदी आपुलकीने म्हंटले की, महिला सुद्धा भावूक झाली. त्याच क्षणी महिलेला जाणवले की, चालक हार मानत नसेल तर मी तरी का हार मानू? महिला स्वतः एक रायडर असल्यामुळे, तिने कधीही दुसऱ्या रायडरला अर्ध्यावर सोडू नये हे शिकलं आहे. म्हणून अनोळखी रस्त्यावर, अनोळखी चालका बरोबर बाईकची चेन दुरुस्त करण्यास फोनचा टॉर्च चालू ठेवून मदत करायला सुरुवात केली. यादरम्यान रॅपीडो चालकाने कोणतीही तक्रार केली नाही. मग मध्यरात्री दोन अनोळखी लोकांमधील टीमवर्क यशस्वीरीत्या पार पडले आणि त्याने महिलेला रात्री १ वाजता घरी सुरक्षित सोडले.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ashamane_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “अशा आणखी रायडर्सची आपल्याला गरज आहे… कारण त्यांच्यामुळेच महिला दिवसा असो वा रात्र रॅपिडो बाईकवरून अगदी बिन्दास्त प्रवास करू शकतात” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. त्यामुळे कधीकधी आपण जगातील वाईट गोष्टींबद्दल इतके ऐकतो की, जगात चांगले लोक आहेत; हे आपण विसरूनच जातो.
