Viral Video: इतरांना मदत करणं किंवा आपला थोडासा वेळ दानधर्मासाठी देणं, यातून आपल्याला काहीशी सात्त्विकतेची भावना अनुभवायला मिळते. त्यातून आपल्याला कोणताही आर्थिक लाभ होत नसला तरीही आपल्या त्या कृतीमुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य येतं; जे खूपच अनमोल असतं. असं म्हणतात की, आयुष्यात तुम्ही कितीही यश मिळवलं तरी तुमच्यात इतरांबद्दल सहानुभूती, दया नसेल, तर तुम्ही एक चांगला माणूस बनू शकत नाही. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एकट्यानं प्रवास करणाऱ्या एका तरुणीला पाहून एका तरुणानं एक खास भेटवस्तू तिला दिली.

प्रवासादरम्यान एक तरुणी बर्गर खाताना दिसतेय. तितक्यात तिच्याजवळ एक अज्ञात तरुण येतो आणि तरुणीच्या हातात पुष्पगुच्छ देतो. मग तो स्वतःच्या बुटाची लेस बांधण्यास सुरुवात करतो. ती तरुणी हातात तो पुष्पगुच्छ घेऊन संयमानं बसलेली असते. पण, पुढे त्या तरुणानं काय केलं, तरुणीकडून तो पुष्पगुच्छ परत घेतला की तिला भेट दिला ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा खेळ; प्रवाशाचा तोल गेला अन्…. CCTV मध्ये कैद झाली घटना

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणी स्वतःचा बर्गरसुद्धा त्या तरुणाला खायला देते. त्यानंतर तो जागेवरून उठतो आणि तरुणीच्या हातात एक चिठ्ठी देतो. तरुणी पुष्पगुच्छ परत देते तेव्हा तरुण तो परतही घेत नाही आणि तिथून निघून जातो. तरुणानं दिलेला पुष्पगुच्छ आणि चिठ्ठी वाचल्यानंतर आपसूकच तरुणीच्या डोळ्यांत पाणी येतं. तुमची दयाळूपणाची कृती एखाद्याचा दिवस खास करू शकते हे या व्हायरल व्हिडीओतून पाहायला मिळतं.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @HumanityChad या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्या तरुणानं दयाळूपणाच्या त्या छोट्याशा कृतीनं नेटकऱ्यांचीही मनं जिंकून घेतली आहेत. अनेक जण हा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच सोशल मीडियावर या व्हिडीओनं अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत.