shocking video: अलीकडच्या काळात हॉटेल्स, मेस आणि हॉस्टेल्समध्ये स्वच्छतेचा भंग करणारे, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारे अनेक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होताना दिसतात. कधी स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कधी कर्मचारी अन्नाशी गैरवर्तन करताना दिसणारे प्रसंग; या सर्वांमुळे लोकांमध्ये भीती आणि अविश्वास वाढतो आहे.

विद्यार्थी आणि सामान्य नागरिक रोजच्या जेवणावर अवलंबून असलेल्या अशा ठिकाणी मूलभूत स्वच्छतेची पातळीच खालावलेली दिसते आणि यामुळे प्रशासन व व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशाच प्रकारचा आणखी एक संतापजनक व्हिडीओ आता तेलंगणातून समोर आला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

तेलंगणातील सांगारेड्डी येथील एका सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये घडलेली घटना सध्या जोरदार चर्चेत आहे. विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या भाताच्या मोठ्या भांड्यात एक वॉचमन नशेत पाय ठेवून झोपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यानेच असे गैरजबाबदार वर्तन केल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक लोक खूप संतापले आहेत.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये चंद्रशेखर नावाचा वॉचमन पूर्ण नशेत पडलेला दिसतो. तो मोठ्या भाताच्या पातेल्याला टेकून बसलेला असतो आणि त्याचा एक पाय थेट विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या भातात घातलेला असतो. विद्यार्थी त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तो इतका दारू प्यायलेला असतो की तो हलतही नाही. हा प्रकार पाहून विद्यार्थी घाबरून जातात आणि लगेचच कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात. त्यानंतर तो भात संपूर्ण फेकून देतात आणि विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ताजं जेवण बनवलं जातं.

व्हिडीओ व्हायरल होताच विद्यार्थी, पालक आणि स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी “हे विद्यार्थी हॉस्टेल आहे की दारुड्यांचं ठिकाण?” असा प्रश्न केला, तर काहींनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची गंभीर चिंता व्यक्त केली.

अनेकांनी अन्नाच्या स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे सांगत, “मुलं इथे जेवतात, ताबडतोब कडक कारवाई करा” अशी मागणी केली. काहींनी हॉस्टेल प्रशासनावरही टीका करत “असा प्रकार करण्यापर्यंत कर्मचारी पोहोचतात म्हणजे देखरेख किती सैल आहे?” असे म्हणत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांनीही सरकारला टॅग करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली.