Virar Local Train Shocking Video : दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. परवडणाऱ्या दरात आणि कमी वेळात ठराविक ठिकाणं गाठता येत असल्याने प्रवासी रेल्वेचा मार्ग निवडतात. पण, यामुळे प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढतेय. यात पश्चिम रेल्वेचा विरार-चर्चगेट लोकल प्रवास म्हणजे आगीशी खेळल्याचा प्रकार आहे. या रेल्वे मार्गावर सकाळी ७.३० ते १२ आणि संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान इतकी गर्दी असते की नीट श्वास घेण्यासाठी जागा उरत नाही. तरीही नोकरी-धंद्यासाठी प्रवासी नाईलाज म्हणून जीव गुदमरला तरी रोज त्या गर्दीतून प्रवास करतात. याच विरार प्रवासादरम्यानचं एक भीषण, भयंकर दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे, जे पाहून तुम्हाला कळेल की विरारकर एक ट्रेन पकडण्यासाठी कसे रोज स्वत:च्या जीवाशी खेळतात.

विरार लोकल प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा ठरतोय, यात गर्दीच्या वेळात तर चर्चगेटपासूनच अनेक ट्रेन्स भरून जातात, त्यामुळे पुढल्या स्थानकांवर चढणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी सोडा उभं राहण्यासाठीही नीट जागा शिल्लक नसते; त्यामुळे तासनतास उभे राहून प्रवासी विरार गाठतात. यात दुसरीकडे बोरिवलीला उतरून विरार ट्रेन पकडणाऱ्यांची संख्यादेखील फार मोठी आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस बोरिवलीहून विरार ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरश: धावाधाव सुरू असते. मात्र, काही प्रवासी यातही जीवघेणा शॉर्टकट घेताना दिसतात, याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात प्रवासी फलाटावर उभ्या असलेल्या चर्चगेट लोकलमधून थेट बाजूला उभ्या असलेल्या विरार लोकलमध्ये गटार पार करून चढताना दिसतायत. हे दृश्य आजचे नाही, रोजचे आहे. यात अपघाताची शक्यता आहे, पण प्रवासी जीवापेक्षा लवकर घर गाठण्याच्या नादात असले जीवघेणे प्रकार करताना दिसतात.

हा व्हिडीओ बोरिवली रेल्वेस्थानकातील आहे, जिथे एका फलाटावर चर्चगेट लोकल उभी आहे, तर विरुद्ध दिशेच्या फलाटावर विरार लोकल उभी आहे. यावेळी ब्रिज क्रॉस करून ट्रेन पकडण्याऐवजी काही प्रवासी थेट चर्चगेट लोकल ट्रेनमधून विरार लोकलमध्ये उडी घेत आहेत. दोन ट्रेनच्यामध्ये एक गटार आहे, ज्यावरील रेलिंगवर पाय ठेवून अनेक प्रवासी चर्चगेट लोकलमधून विरार लोकलमध्ये शिरत आहेत. चुकून एखाद्याच्या पाय सरकला तर तो प्रवासी खाली कोसळू शकतो किंवा चुकून ट्रेन सुरू झाली तर भीषण अपघाताची घटना घडू शकते; पण याचा थोडाही विचार प्रवासी करत नाहीत. काही मिनिटं लवकर पोहोचण्याच्या नादात ते आपला जीव धोक्यात घालतात.

विरार लोकल ट्रेनचा हा व्हिडीओ chalo.virar नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, घरचेही तुमची वाट बघतायत याचा जरा विचार करा. दुसऱ्याने लिहिले की, रोज सोमवार ते शुक्रवारी ऑफिसच्या वेळात संध्याकाळी ८.१६ च्या दरम्यान बोरिवली ते विरार धिम्या लाईनवर हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्याने लिहिले की, लोकल ट्रेनचा प्रवासच जीवघेणा आहे. चौथ्याने लिहिले की, विरारकरांसाठी काही रिस्क वाटत नाही यात.