करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवण्याही बंद आहेत. अशा परिस्थितीतही काही शिक्षक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन क्लास घेतायेत. पश्चिम बंगालमधील एक शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लास घेत आहे. पण, मोबाइलला नेटवर्क नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. मात्र, त्यावरही या शिक्षकाने एक भन्नाट शक्कल लढवलीये.

सुब्रत पाती असे या ३५ वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. कोलकाता येथे दोन शैक्षणिक संस्थांमध्ये ते इतिहास विषय शिकवतात. करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते बांकुरा जिल्ह्यातील अहांदा या आपल्या मूळ गावी परतले. पण, गावी असलो तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी ऑनलाइन शिकवण्याचं ठरवलं. मात्र, गावात नेटवर्कची मोठी समस्या होती, वारंवार नेटवर्क जात असल्याने ऑनलाइन क्लास घेणं कठीण होऊन बसलं होतं.

पण, सुब्रत पाती यांनी त्यावर उपाय शोधला. घराच्या समोर थोड्या अंतरावर असलेल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडावर चढल्यावर नेटवर्क येतं हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी झाडावर चढून शिकवण्याचं ठरवलं. त्यासाठी झाडावर फांद्यांच्यामध्ये बांबू, काठ्या आणि गवत लावून बसण्यासाठी जागा केली. तेव्हापासून दररोज सकाळी उठून ते झाडावर चढतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. वारंवार झाडावरुन खाली उतरण्यास जमत नाही त्यामुळे सुब्रत त्यांच्यासोबत पाण्याची बाटली आणि डब्बाही घेऊन जातात. सकाळी ९.३० ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध क्लासेस ते घेतात आणि नंतरच झाडाखाली उतरतात.

सुब्रत यांचे झाडावरुन शिकवतानाचे फोटो सोशल मीडियामध्येही व्हायरल होत असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ते स्वतः त्रास सहन करतायेत याबाबत त्यांचं कौतुक होतंय.