भारताची क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या विरोधात कसोटी सामना खेळते आहे. अशात भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत हा या टीमचा भाग नाही. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळण्याचा ऋषभचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी ऋषभचा जो अपघात झाला त्यानंतर आपल्या जखमा भरून येण्यासाठी तो आराम करतो आहे. लवकरच आपण टीम इंडियामध्ये परतू असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. ३० डिसेंबर २०२२ ला ऋषभ पंतचा दिल्ली देहरादून महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली होती. यातून वाचलेला ऋषभ आता हळूहळू बरा होतो आहे. त्याची प्रकृती आता बरीच बरी आहे.
काय म्हटलं आहे ऋषभ पंतने?
मी सध्या आराम करतो आहे. तसंच माझ्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. मेडिकल टीमच्या सपोर्टनंतर मी लवकरच पूर्वीसारखा फिट अँड फाईन होईन असा विश्वास मला वाटतो. माझा जो अपघात झाला तो खरंतर माझ्या जिवावर बेतू शकला असता इतका भयंकर होता. अशा अपघातातून वाचणं कठीण असतं अनेकदा पण मी वाचलो. या अपघातानंतर आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टीकोन मला मिळाला होता. आज मी आयुष्यातला तो प्रत्येक क्षण अनुभवतो आहे आणि आनंदी होतो आहे जो अगदी छोट्यातला छोटा क्षण आहे. आपण आपल्या मोठ्या स्वप्नांच्या मागे लागून आयुष्यातल्या अनेक छोट्या छोट्या आनंदांचा पूर्णपणे आस्वादच घेत नाही असंही ऋषभने सांगितलं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत पंतने हे भाष्य केलं आहे.
आपल्या हाताने ब्रश करण्यातही वेगळाच आनंद आहे
ऋषभ म्हणतो, सकाळी उठून मी जेव्हा ब्रश करतो तेव्हाही मला एक वेगळाच आनंद मिळतो. गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपण त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतो. मला हे तर सांगताही येणार नाही की आज मी क्रिकेट किती मिस करतोय. माझा रोजचा दिनक्रम सुरू होतो त्यावेळी मला क्रिकेटची आठवण येतेच. सकाळी उठलो की फिजिओ थेरेपिस्टसह माझं एक सेशन असतं. त्यानंतर काही वेळ आराम करून इतर व्यायाम करतो. तिसऱ्या सेशनमध्ये मला नाश्ता आणि फळं खायची असतात. रोज उन्हातही बसतो. जोपर्यंत मी नीट चालू शकत नाही तोपर्यंत माझा दिनक्रम असाच असणार आहे असंही ऋषभ पंतने सांगितलं आहे.
कसा झाला होता ऋषभ पंतचा अपघात?
टीम इंडियाचा स्टार विकेट कीपर ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ ला अपघात झाला. या कार अपघातात ऋषभ पंत खूप जखमी झाला. ऋषभ त्याच्या मर्सिडिझमधून दिल्लीहून रुरकीला जात होता.ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली त्यामुळे कारला आग लागली. ऋषभ पंत विंड स्क्रिन तोडून बाहेर पडला होता. स्थानिकांनी त्याला ओळखलं आणि त्याला रुरकीमध्ये दाखल केलं. त्यानंतर देहरादून आणि मुंबईतल्या रूग्णालयांमध्ये त्याच्यावर उपचार झाले. आता ऋषभ हळूहळू बरा होतो आहे.
