स्वयंपाक करताना काही विशिष्ट पदार्थांची चव वाढवण्यासाठी काळ्या मिठाचा वापर नेहमी करण्यात येतो. फळांचे सॅलेड, चाट, कोशिंबीर, लिंबू पाणी या पदार्थांमध्ये काळ्या मिठाचा वापर अनेकदा केला जातो. पण, हे काळं मीठ कसं तयार करण्यात येतं, हे तुम्हाला माहीत आहे का ? तर आज सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काळं मीठ कसं तयार करण्यात येते, याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडीओत दोन्ही बाजूने विटा रचून काळं मीठ बनवण्यासाठी एक सेटअप तयार करून घेतला आहे. या सेटअपमध्ये सुकलेलं शेण लाकडांवर ठेवलं जात आहे आणि त्यावर कोळशाचे छोटे-छोटे तुकडे टाकले जात आहेत. त्यानंतर काही रबरचे तुकडे घेतले आहेत, त्यांना आग लावून या जळत्या रबरच्या तुकड्यांना तयार केलेल्या सेटअपमध्ये टाकलं जात आहे. त्यानंतर पुन्हा आगीत सुकलेलं शेण टाकलं जात आहे. तसेच काळं मीठ बनवण्यासाठी खास एक दिवस वापरण्यात येतील अशी मातीची भांडी तयार करून घेतली आहेत. काळे मीठ कसे बनते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा :
मातीची भांडी या आगीवर ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर या भांड्यांमध्ये रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ टाकण्यात आले आहे. चार-पाच किलो सैंधव मीठ यामध्ये घालण्यात येते आहे. पण, इथे कर्मचारी हे अंदाजाने घालताना दिसत आहेत. त्यानंतर या भांड्यांवर झाकण ठेवून वरून कोळश्याचे तुकडे टाकले जात आहेत. त्यानंतर २४ तास याला असेच ठेवून दिले आहे. चोवीस तासांनंतर या मडक्यांना बाहेर काढून फावडे वापरून त्यांना फोडण्यात येते आणि जांभळ्या रंगाचे काळं मीठ तयार झालेलं तुम्हाला दिसून येईल.
तसेच हे मीठ इथून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवलं जातं. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. निखिल चावला असे या युजरचे नाव आहे; त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर @hmmnikhil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि काळं मीठ बनवण्याची प्रक्रिया व्हिडीओत सांगितली आहे. चिमूटभर काळ्या मिठासाठी एवढी मेहनत करावी लागते, हे बघून अनेक जण कमेंटमध्ये आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि कामगारांचे कौतुक करताना दिसून आले आहेत.