भाषा माहिती असली की दोन व्यक्तीमधले संवाद सोपे होतात. जर आपल्याला एकमेकांची भाषाच माहिती नसेल तर मात्र संवाद तिथेच थांबतो. पण कधी विचार केला आहे का की एखाद्या भाषेचे ज्ञान नसणे हे माणसांनाच नाही तर एका प्राण्याला देखील त्रासदायक ठरू शकते. असाच काहीसा विचित्र प्रसंग उदयपूरमध्ये झाला आहे. सज्जनगढ बायोलॉजिकल पार्कमध्ये चेन्नईहून एक पांढरा वाघ आणण्यात आला. पण या वाघाला कोणत्याही सूचना करायच्या म्हणजे इथल्या कर्मचा-यांपुढचे मोठे आव्हानच आहे. कारण या वाघाला फक्त तामिळ भाषेतल्या सुचना समजतात. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार उदयपुरच्या सज्जनगढ बायोलॉजिकल पार्कमध्ये चेन्नईहून काही दिवसांपूर्वी वाघ आणण्यात आला, त्याबदल्यात या पार्कमधील दोन कोल्हे हे चेन्नईत पाठवण्यात आले. पण या वाघाला येथे आणल्यानंतर नवी समस्याच कर्मचा-यांसमोर आली आहे. मुळात चेन्नईत जन्माला आलेल्या या वाघाला लहानपणापासूनच तामिळ भाषेतील सूचना ऐकण्याची सवय झाली आहे. सज्जनगढ पार्कमध्ये मात्र कोणालाही हिंदी आणि मेवाडी या दोन भाषांव्यतिरिक्त इतर भाषा बोलता येत नाही त्यामुळे या वाघाला हाताळायचे कसे ही मोठी समस्या त्यांच्यासमोर आहे. शेवटी पूर्वी या वाघाची काळजी घेणा-या कर्मचा-यालाच चेन्नईहून काही दिवसांसाठी बोलावून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी तसे पत्रही  चेन्नईतल्या पार्कला लिहले आहे.