जगभरात करोना व्हायरसचं संकट अजुन काही शमलेलं नाही. अमेरिका आणि युरोपीय देशात करोनाची चौथी पाचवी लाट सुरूये. तर दुसरीकडे आफ्रिका देशातील बोत्सवानामध्ये करोना व्हायरसचा व्हेरिएंट आढळला आहे. या व्हेरिएंटचं नामकरण B.1.1.529 असं करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या व्हेरिएंटला ‘ओमिक्रॉन’ असं नाव दिलंय. पण आता या नामकरणावरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डब्ल्यूएचओने करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या नामकरणात ‘Nu’ किंवा ‘Xi’ ऐवजी ‘ ओमिक्रॉन’ हे नाव का ठेवले? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. पण यामागचं कारण सुद्धा तितकंच खास आहे. कुणाचीही बदनामी होण्यापासून वाचवण्यासाठी डब्ल्यूएचओने हे पाऊल उचलले असल्याचे जाणकारांचे मत आहे. या प्रकारांची वैज्ञानिक नावं जीनोम अनुक्रम आणि संशोधन यासारख्या इतर उपयोगांसाठी वापरली जात आहेत. आता संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया.

WHO ने करोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नामकरण करताना ग्रीक वर्णमालेनुसार नाव देण्याबाबत विचार सुरू होता. जेणेकरून करोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव घेणं सोपं होईल. ग्रीक वर्णमालेतील लॅम्बडा नंतर ‘Nu’ किंवा ‘Xi’ ही नावं येतात. या दोघांनंतर ‘ओमिक्रॉन’चा नंबर येतो. करोनाच्या नवीन प्रकाराला या दोघांपैकी एक नाव दिले जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. एका अधिकार्‍याने गुरुवारी द टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्राला कलंकापासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

द टेलिग्राफचे वरिष्ठ संपादक पॉल नुची यांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणाले, “डब्ल्यूएचओच्या एका सुत्राने खात्री केली आहे की ग्रीक वर्णमालेतील ‘Nu’ किंवा ‘Xi’ हे शब्द जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. ‘Nu’ सोबत ‘न्यू’ या शब्दाासोबत होणारी विसंगती लक्षात घेऊन आणि क्षेत्राला कलंकापासून वाचवण्यासाठी ‘Xi’ या नावांना वगळण्यात आलं आहे.’ विशेष म्हणजे चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव शी जिनपिंग आहे. अमेरिकेचे सिनेटर टेड क्रुझ यांनी WHO च्या या निर्णयाला विरोध केला आहे. ते म्हणाले, “जर WHO ला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची इतकी भीती वाटत असेल तर पुढच्या वेळी ते जागतिक महामारी लपवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांच्यावर विश्वास कसा ठेवता येईल?”.

Omicron म्हणजे नक्की काय ?

‘ओमिक्रॉन’ हे ग्रीक वर्णमालेतील १५ वे अक्षर तसंच प्राचीन आणि जुने ग्रीकचे १६ वे अक्षर आहे. ग्रीक अंकांच्या बाबतीत त्याचे मूल्य ७० असं आहे. हे अक्षर फोनिशियन अक्षर ayin मधून आले आहे, ज्याचा आकार वर्तुळासारखा आहे. तसेच फोनिशियन भाषेत याचा अर्थ ‘डोळा’ असा होतो. ओमीक्रॉनला ‘लिटल ओ’ म्हणूनही ओळखले जाते.

आणखी वाचा : २०२२ मध्ये होणार तिसरं महायुद्ध? अनेक देश अणुबॉम्बने संपतील, काय दडलंय नास्त्रोदमसच्या भयानक भविष्यवाणीत ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

WHO ग्रीक अक्षरे का वापरतात?

या वर्षी ३१ मे रोजी, WHO ने SARS-CoV-2 च्या महत्त्वाच्या व्हेरिएंट्ससाठी ‘साधे, बोलण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे’ वर्ण दिले. संस्थेने म्हटले आहे की ही लेबल सध्याची वैज्ञानिक नावांची जागा घेऊ शकत नाही. व्हेरिएंट्सच्या वैज्ञानिक नावांमध्ये शास्त्रज्ञांची महत्त्वाची माहिती असते. ही माहिती संशोधनातही वापरली जाते.