Shantanu Naidu’s Post On Last Tata Nano Car: लिली नावाच्या शेवटच्या टाटा नॅनो कारला भारतीय ऑटोमोटिव्ह इतिहासात एक विशेष स्थान आहे. रतन टाटा यांच्या पुढाकाराने केवळ एक कॉम्पॅक्ट कार नाही तर भारतीय मध्यमवर्गासाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या टाटा नॅनो कारची निर्मिती करण्यात आली होती.
दरम्यान रतन टाटांचे माजी सहाय्यक आणि आता टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर व स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजचे प्रमुख शंतनू नायडू यांच्या मालकीची लिली नावाच्या नॅनोला एका कारपेक्षा मोठे स्थान आहे. शंतनू नायडू यांनी इंस्टाग्रामवर नॅनो कारबाबत एक हृदयस्पर्शी पोस्ट केली आहे. जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिलीच्या शेजारी उभे राहून काढलेला फोटा आणि कारचे महत्त्व यावर टिप्पणी केली आहे.
रतन टाटांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू हे शेवटच्या टाटा नॅनोचे मालक आहेत, ज्याचे नाव त्यांनी प्रेमाने “लिली” असे ठेवले आहे. दरवर्षी ५०-६० लाख रुपये कमावणारे आणि लक्झरी कार खरेदी करण्याची आर्थिक क्षमता असूनही, शंतनू ही सहा वर्षे जुनी नॅनो वापरतात, ही रतन टाटांच्या दूरदर्शी स्वप्नाला खरी श्रद्धांजली आहे.
शंतनू नायडू यांची भावनिक पोस्ट
एका हृदयस्पर्शी इंस्टाग्राम पोस्टमध्ये, शंतनू यांनी लिलीचे वर्णन केवळ ती केवळ एक कार नसून, एका अभियांत्रिकी वारशाचा जिवंत पुरावा आहे आणि कधीही न विसरता येणारी “आठवण” आहे, असे केले आहे.
त्यांच्या पोस्टमध्ये नायडू यांनी म्हटले आहे की, “आज लिलीला सहा वर्षे पूर्ण झाली. ती लहान असेलही पण तिने माझे संपूर्ण आयुष्य, यश, अपयश, प्रेम आणि संकटे सांभाळली आहेत. ती एक कधीही विसरता न येणारा अभियांत्रिकी वारसा जपणारी आठवण आहे. निष्ठा आणि प्रेमाबद्दल लिलीचे आभार. सहाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दुकानातील शेवटच्या नॅनोला शुभेच्छा.”
अनेक भारतीय कुटुंबे ज्या दुचाकींवर अवलंबून होती त्यांना परवडणारी, सुरक्षित आणि चारचाकी पर्याय देण्याच्या उद्देशाने २००८ मध्ये नॅनो कार लाँच करण्यात आली होती. ही साधी पण प्रभावी कार जनतेला सुरक्षित, अधिक सुलभ वाहतुकीचे साधन प्रदान करण्याच्या रतन टाटांच्या वचनबद्धतेचे प्रतीक होती.
कोण आहेत शंतनू नायडू?
शंतनू नायडू यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण घेतले असून, कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. २०१८ मध्ये नायडू टाटा कंपनीत रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून रुजू झाले होते.
शंतनू यांचे रतन टाटा यांच्याशी असलेले संबंध व्यावसायिकांपेक्षा वैयक्तिक होते. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात नायडू यांचेही नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टाटांनी नायडू यांचे शैक्षणिक कर्ज माफ केले आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार देणाऱ्या नायडू यांच्या स्टार्टअप गुडफेलोजमधील त्यांचा हिस्साही सोडून दिला आहे.