लडाख किंवा हिमाचल प्रदेश म्हटले की, आपल्या नजरेसमोर उभे राहते तेथील मनमोहक निसर्गसौंदर्य. या नैसर्गिक सौंदर्याचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी फिरायला जात असतात. पण तुम्ही कधी लडाख किंवा हिमाचल प्रदेशात फिरायला गेलात तर तुम्हाला तिथे अनेक ठिकाणी लावलेले रंगीबेरंगी झेंडे दिसतील ज्यावर काही मंत्रदेखील असतात. हे झेंडे विशेषत: लडाख, तिबेट, भूतान आणि नेपाळमध्ये दिसून येतात. अनेक जण या झेंड्यांकडे केवळ सजावट म्हणून बघतात, पण हा गैरसमज आहे. या झेंड्यांना काही विशेष महत्त्व आहे. याच झेंड्यांबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रेअर फ्लॅग्स –

ट्रॅवल जुनून डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, तिबेटमध्ये या झेंड्यांना प्रेअर फ्लॅग किंवा प्रार्थनाध्वज असे म्हटले जाते. पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या पर्वतावर हे रंगीबेरंगी झेंडे सुंदर दिसतात. झेंड्यांवर लिहिलेल्या मंत्रांना आणि रंगांना विशेष अर्थ आहे.

झेंड्यांचे बौद्ध धर्मामधील आध्यात्मिक महत्त्व –

असे म्हणतात की, प्रार्थनाध्वज पहिल्यांदा गौतम बुद्धांनी वापरला होता. या झेंड्यांचे बौद्ध धर्मामध्ये आध्यात्मिक महत्त्व आहे. बौद्ध धर्मामध्ये प्रार्थना करताना या झेंड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या झेंड्यांना प्रार्थनाध्वज असेही म्हटले जाते. तसेच हे झेंडे वातावरणात शांती, प्रेम, दया आणि करुणा पसरवतात शिवाय ते जगात शांती निर्माण करण्यास मदत करतात अशी बौद्ध धर्मातील लोकांची श्रद्धा असल्याचे सांगितले जाते.

झेंड्यांचा रंग आणि त्यावरील मंत्रांचे महत्त्व –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे झेंडे वेगवेगळ्या रंगांचे असतात. यामध्ये लाल, पिवळा, निळा, पांढरा, हिरवा अशा रंगांचा समावेश असतो. लाल रंग हे अग्नीचे प्रतीक आहे, तर निळा रंग आणि पांढरा रंग हे हवेचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा पृथ्वीचे, तर हिरवा रंग हा पाण्याचे प्रतीक आहे. या झेंड्यावरील मंत्र हे संस्कृत भाषेत लिहिलेले असतात. या मंत्रांनाही विशेष महत्त्व आहे. या मंत्रांमुळे जगात शांतता पसरते, अशी काही लोकांची श्रद्धा आहे.