भारताची ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखले जाणारे जयपूर शहर हे राजस्थानची राजधानी आहे. या रोमँटिक आणि रंगीबेरंगी नावामागचं कारण म्हणजे या शहराची समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा, त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक या शहराला भेट देतात.

या शहराचा गुलाबी रंग केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर जयपूरच्या आदरातिथ्य, परंपरा आणि राजेशाही परंपरांचं प्रतीक आहे. ‘पिंक सिटी’ या नावामागच्या गोष्टीचा इतिहास १८७६ सालापर्यंत मागे जातो. त्या वर्षी वेल्सचे राजकुमार (नंतरचे राजा एडवर्ड सातवे) भारत दौर्‍यावर येणार होते.

राणी व्हिक्टोरियाचे पती आणि राजघराण्याचे मान्यवर पाहुणे म्हणून त्यांचे खास स्वागत करण्यासाठी महाराजा सवाई रामसिंह द्वितीय यांनी संपूर्ण जयपूर शहराला नव्या आणि आकर्षक रूपात सजवण्याचा निर्णय घेतला.

त्या काळी गुलाबी रंग हा आदरातिथ्य आणि स्वागताचे प्रतीक मानला जात असल्याने संपूर्ण शहरातील इमारतींना गुलाबी छटा असलेला रंग देण्यात आला. हा उपक्रम केवळ राजघराण्याच्या पाहुण्याचं स्वागत करण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर ती पुढे एक परंपरागत आणि ऐतिहासिक प्रथाच ठरली.

स्थापत्यशास्त्राच्या मदतीने केलेली जयपूरची वास्तुरचना तिच्या एकसंध आणि आकर्षक सौंदर्यामुळे इतर सर्व शहरांपेक्षा वेगळी भासते. गुलाबी रंगाच्या छटा आणि जुनी तटबंदी असलेलं शहर राजेशाही दरवाजे, गजबजलेले बाजार आणि भव्य राजवाडे, यांच्या माध्यमातून प्राचीन सौंदर्याची झलक जपण्यात आली आहे.

हवामहल, सिटी पॅलेस आणि जंतरमंतर यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळं या शहराच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. राजस्थान सरकारनेही ही परंपरा कायम राहावी म्हणून जुन्या शहरातील रहिवाशांनी आपल्या घरांचा गुलाबी रंग कायम ठेवावा, यासाठी कायदेशीर तरतूद केली आहे.

जयपूरच्या गुलाबी भिंती या राजस्थानच्या राजधानीचा इतिहास, तिचं राजेशाही वैभव आणि आत्मियतेचं प्रतीक आहेत. २०१९ साली जयपूरला युनेस्कोने ‘जागतिक वारसा शहर’ (World Heritage City) म्हणून घोषित केलं, त्यामुळे त्याच्या सांस्कृतिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

थोडक्यात सांगायचं झालं, तर जयपूरला ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखलं जातं कारण हे शहर शतकानुशतकं पाहुण्यांचं मनापासून स्वागत करत आलं आहे. त्याची सुबक आणि नीटनेटकी वास्तुरचना जगभरातील पर्यटकांना आजही भुरळ घालत आहे. हेच जयपूरचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे.