झोपेत स्वप्न पाहणे ही सामान्य गोष्ट आहे. स्वप्न पाहिली नाहीत तर झोपेला काय अर्थ ? कोणी झोपेत श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतो तर कोणी यशस्वी होण्याची. स्वप्नांच्या दुनियेत रंगून जाणे हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. पण काही जण असेही आहेत ज्यांना या स्वप्नांपेक्षाही काही विचित्र स्वप्न पडतात. त्यातलेच एक सर्वसामान्य स्वप्न म्हणजे उंच ठिकाणांहून तोल जाण्याचे.
झोपेत अनेकांना आपण उंच ठिकाणाहून खाली पडतो आहोत अशा प्रकारची स्वप्ने वारंवार पडतात. कधीतरी अशा भितीदायक स्वप्नातून आपण झोपेतून धडपडून जागेही होतो. पण अशी स्वप्न वारंवार का पडतात ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण या स्वप्नांवरून घाबरुन जाण्याची काहीच आवश्यक्यता नाही. कारण अशा प्रकारची स्वप्ने ही अनेकांना पडतात. ही अत्यंत सामान्य स्वप्न आहेत. ‘मनी असे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात ना! हा नियम येथेही लागू होतो. अनेकदा आयुष्यात आपण वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असतो आणि याच गोष्टी मग स्वप्नांत येतात. काही मनोवैज्ञानिकांच्या मते करिअर, आर्थिक बाब, कुटुंब, प्रेम या ठिकाणी तुमचा संघर्ष सुरु असेल तर अशी स्वप्न पडणे हे सर्वसामान्य आहे. प्रत्येक जण एखाद्या वाईट गोष्टींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो, त्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो साहजिकच स्वप्नांतून कधी कधी बाहेर येतो. करिअर, कुटुंब, आर्थिकरित्या स्थिरता प्राप्त करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात, त्यामुळे या गोष्टी मिळवण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष करते, त्यातील यश अपयशाचे टप्पे पार करते तेव्हा अशा प्रकारची स्वप्न पडणे ही अत्यंत सर्वसामान्य बाब आहे.
तर अनेकदा तणावामुळे देखील अशा प्रकारची स्वप्न येतात. यश अपयशाच्या शर्यतीत आपण मागे तर पडत नाही ना अशी चिंता प्रत्येकाला सतावते. या गोष्टींचा माणूस जेव्हा गरजेपेक्षा जास्त विचार करू लागतो तेव्हा अशी स्वप्ने पिच्छा पुरवतात. काही वेळा आत्मविश्वासाची कमतरता हे देखील कारण असू शकते. अशा स्वप्नातून घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण अशी स्वप्न पाहणारे तुम्ही काही एकटे नाहीत हे ही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जितके सकारात्मक राहाल तितक्या लवकर या स्वप्नांपासून तुम्हाला सुटका मिळेल.